पुणे ग्रामीण भागात गेल्या वर्षेभरात दरोडय़ाच्या गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. द्रुतगती, महामार्ग आणि कंपन्यांवरील दरोडय़ांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हेगारांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करीत १४ मोक्का आणि दहा जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
पुणे जिल्ह्य़ातील वर्षेभराच्या गुन्हेगारीबाबतची माहिती पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. त्या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर उपस्थित होते. लोहिया म्हणाले की, पुणे जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरात एकूण ९ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्य्ेा खून, चोरी, दरोडय़ाच्या आणि सायबर गुन्ह्य़ात वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ४२ दरोडय़ाचे गुन्हे दाखल होते. त्यामध्ये वाढ होऊन २०१४ मध्ये ८६ गुन्हे घडले आहेत. दरोडय़ाचे गुन्हे हे प्रामुख्याने महामार्ग आणि कंपन्यांवर झालेले होते. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांच्या विरोधात कडक कारवाई करीत दरोडेखोरांच्या टोळ्यांना अटक केली आहे. या गुन्ह्य़ाबरोबर घरफोडीच्या गुन्ह्य़ातदेखील वाढ झाली असून गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे जिल्ह्य़ात गुन्हे दाखल करून घेतल्यामुळे ही वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हे वाढल्याचे प्रमाण दिसत असल्याचे लोहिया यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्य़ात सक्रिय असलेल्या टोळ्यांवर वचक बसविण्यात यश आले आहे. पौड भागात सर्वात जास्त टोळ्या सक्रिय होत्या. या ठिकाणी चार टोळ्यांतील साठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. पुणे जिल्ह्य़ातील गुन्हेगारांचे शिक्षा प्रमाण वाढले आहे. २०१३ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण १५ टक्के होते, ते गेल्या वर्षी १९.८ टक्के झाले आहे, असे लोहिया यांनी सांगितले.