पुण्यात नोकरीसाठी आलेल्या दोन संगणक अभियंत्यांच्या खुनाचे गूढ वर्षभरानंतरही कायम आहे. हिंजवडी-मारुंजी आणि वाघोली येथे एकाच आठवडय़ात वर्षांपूर्वी हे दोन खून झाले होते. या दोन्ही खूनप्रकरणी पोलिसांना अद्यापपर्यंत ठोस अशी काहीही माहिती मिळालेली नाही. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विविध पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न करून अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. मात्र त्यातून काही माहिती मिळालेली नाही.
यातील वाघोलीत खून झालेल्या तरूणाच्या वडिलांनी आता स्वत: या गुन्ह्य़ाचा तपास हाती घेतला आहे. अनेक प्रश्न त्यांनी पोलिसांसमोर मांडले आहेत. या दोन्ही खुनामध्ये काही साम्य आहे का हे शोधण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अभिषेक शरदचंद्र रॉय (वय २१, रा. वाघोली, मूळ रा. भोपाळ) आणि वरूण सुभाष सेठी (वय ३४, रा. िहजवडी, मूळ रा. पंजाब) या दोन संगणक अभियंत्यांचा एकाच आठवडय़ात खून झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी पोलिसांच्या तपासात काहीच प्रगती झालेली नाही. वाघोली येथे राहणारा अभिषेक रॉय याला एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती. तो रुजू व्हायच्या आदल्याच दिवशी त्याचा खून झाला. वाघोलीत तो दोन मित्रांबरोबर राहत होता. १ जून २०१४ रोजी पहाटे दोन जण अभिषेकवर हल्ला करून पळून जाताना त्याच्या मित्राने पाहिले होते. अभिषेकच्या छातीत खोलवर एक वार झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात घरफोडीमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल आहे. अभिषेकचे वडील भोपाळ येथून पुण्यात येऊन या गुन्ह्य़ाच्या तपासाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी स्वत: गुन्ह्य़ाबाबत बरीचशी माहिती गोळा केली आहे.
याबाबात शरदचंद्र रॉय यांनी सांगितले की, अभिषेक राहत असलेल्या खोलीतील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. मात्र, घरमालकाच्या खिडकीतून एक बॅग चोरीला गेल्याचे पोलिसांनी तपासात म्हटले होते. पण, त्या खिडकीचे ग्रिल एवढे लहान आहे, की एकही वस्तू त्यातून बाहेर जाऊ शकणार नाही. या गुन्ह्य़ात पोलिसांनी खुनाचे कलम लावलेले नाही. चोरटय़ांनी त्याच्यावर हल्ला केला म्हटले तर त्यांच्यात झटापटीनंतर आणखी काही वार होण्याची शक्यता आहे. पण, अभिषेकवर एकच वार झाला होता.
अभिषेकच्या वडिलांनी म्हारुंजी येथील तरूणाच्या खुनाचीदेखील माहिती काढली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही खुनांच्या वेळी पुण्यात दंगलीचे प्रकार सुरू होते. त्याचा काही संबंध आहे का हे देखील तपासण्याची गरज आहे, असे रॉय यांचे म्हणणे आहे. याबाबात लोणीकंदचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, या गुन्ह्य़ात तरूणाच्या खुनाचे कारण सिद्ध झालेले नाही. तपासात तसे आढळून आल्यास खुनाचे कलम वाढविता येऊ शकते.
हिंजवडी-मारुंजी रस्त्यावर २९ मे २०१४ रोजी वरूण सुभाष सेठी (वय ३४, मूळ रा. पंजाब) या संगणक अभियंत्याचा खून करण्यात आला होता. सेठी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून रुजू झाला होता. तो घर शोधण्यासाठी मारूंजी परिसरात गेला होता. त्या ठिकाणाहून परत येताना त्याच्यावर वार करून खून केल्याचे आढळून आले. या गुन्ह्य़ाचा तपास पोलिसांनी विविध पद्धतीने केला. त्याच्या सर्व फोन कॉलची तपासणी केली. तसेच, खून झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळून पाहिले. या गुन्ह्य़ाचे तपास अधिकारी एस. पी. भोसले यांनी सांगितले की, या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी खूप प्रयत्न केले. विविध पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण अद्यापपयर्ंत तपासात काहीच प्रगती झालेली नाही.