पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) महत्त्वाची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे १२ सप्टेंबरला बॉम्ब तयार करताना झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळाहून पळून गेलेले आरोपी यापूर्वी मध्य प्रदेशातील खांडवा येथे कारागृह फोडून फरार झाले होते. ते सर्व जण सीमीचे दहशतवादी असून, त्यांच्यावरच पुणे एटीएसचा संशय आहे. पळालेले हे आरोपी दक्षिणेत गेले असल्याने त्यांच्या तपासासाठी पुणे एटीएससची पथके हैदराबाद व परिसरात गेली आहेत.
उत्तर प्रदेशातील बिजनोर या ठिकाणी बॉम्ब तयार करीत असताना शुक्रवारी एका बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर बॉम्ब तयार करणारे पळून गेले. मात्र, पोलिसांना घटनास्थळी महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये मतदार ओळखपत्रही असून, त्यानुसार हे दहशतवादी हिंदू नावे धारण करून राहत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे हेच दहशतवादी खांडवा कारागृहातून पळालेले कैदी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ते गेल्या चार महिन्यांपासून बिजनोर परिसरात राहत होते. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये घातपात घडविण्याचा कट रचला होता. पुण्यात १० जुलै २०१४ रोजी फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंग मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात या आरोपींचाच सहभाग असल्याची महत्त्वाची माहिती एटीएसला मिळाली आहे. त्यानुसार एटीएसची पथके हैदराबाद व परिसरात त्यांच्या मागावर गेली आहेत.
पुण्याच्या मध्यवस्तीत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये १० जुलै रोजी दुपारी मोटारसायकलच्या डिकीमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले होते. या गुन्ह्य़ाचा तपास करीत असताना पार्किंग मध्ये मोटारसायकल लावताना दोन व्यक्ती सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाल्या होत्या.