वडगावशेरी येथील स्मशानभूमीत आईचा अंत्यविधी केलेल्या ठिकाणी गेलेल्या उच्चशिक्षित तरुणीवर येथील सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
धनंजय नामदेव रोकडे (वय २९, रा. वडगावशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी १९ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. वडगाव शेरी येथील स्मशानभूमी येथे तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आईची खूप आठवण येऊ लागल्यामुळे पीडित मुलगी रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एकटीच स्मशानभूमी येथे गेली होती. त्या ठिकाणी बसलेली असताना स्मशानभूमी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या रोकडे याने तरुणीजवळ येऊन तिची चौकशी केली. त्यानंतर तिचे तोंड दाबून जबरदस्तीने ओढत येथील एका खोलीत घेऊन गेला. त्या ठिकाणी तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या तावडीतून सुटका करीत मुलगी बाहेर पळत आली आणि तिने आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. पी. चव्हाण हे करीत आहेत.