शहरात गेल्या दोन दिवसात महिला अत्याचाराच्या एकूण आठ घटना घडल्या असून त्यामध्ये बलात्काराच्या सहा तर दोन विनयभंगाच्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सर्व गुन्ह्य़ातील आरोपींना अटक केली आहे. एम्प्रेस गार्डनजवळील आर्मीच्या कापडी तंबूत लष्करी जवानाने रविवारी दुपारी एका महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. तर, पुणे रेल्वे स्थानकावर पुण्यात आलेल्या एका महिलेवरही दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. दोन दिवसांतील या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
पुण्यात सोमवारी वारजे, वडगावशेरी, सांगवी, शिवाजीनगर आणि डेक्कन येथे महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. वारजे येथील घटनेत एका मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला, तर वडगावशेरी येथे एका उच्चशिक्षित तरुणीवर स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकाने बलात्कार केला होता. तर, शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीतील तरुणीचा विनयभंगाचा प्रकार रविवारी रात्री घडला होता.
लष्करी जवानास अटक
एम्प्रेस गार्डन जवळील आर्मीच्या कापडी तंबूत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून लष्कराच्या १०१ बटालियनचा जवान मधुकर राम देंडे (वय ४१, रा. जळकोटवाडी, तुळजापूर) याला अटक केली आहे. ही महिला मजूर असून ती उन्हाळ्यात पतीसह नगरहून येऊन पुण्यात रसविक्री करीत होती. सहा एप्रिल रोजी देंडे याने पीडित महिलेस साहेब आल्याचा बहाणा करीत लष्कराच्या तंबूत उसाचा रस घेऊन बोलविले. उसाचा एक ग्लास पिऊन झाल्यावर आणखी एक ग्लास रसाची मागणी करीत त्याने तिचे तोंड दाबून बलात्कार केला. पत्नीस उशीर का झाला म्हणून पाहण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला देंडे याने मारहाण केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने नातेवाइकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सहायक पोलीस आर. व्ही. गौड करीत आहेत.
पुण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सोलापूरहून पुण्यात बहिणीकडे आलेल्या एका सोळा वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आदित्य अनिल भिंगारे (वय १९, रा. ताडीवाला रोड) आणि आशिष सुनिल मापारे (वय २०, रा. रेल्वे क्वॉर्टर आळंदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची बहीण पुण्यात राहात असल्यामुळे तिला भेटण्यासाठी ती आली होती. मात्र, पुण्यात आल्यानंतर पीडित मुलीस बहिणीचे घर न सापडल्यामुळे ती पुन्हा रेल्वे स्थानकावर आली. ती एकटी दिसल्याचे पाहून आरोपींनी तिची चौकशी करत तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिच्यावर भिंगारे याने जवळच्या रेल्वे वसाहतीमध्ये नेऊन बलात्कार केला. तर, मापारे याने बलात्काराचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यांना विशेष न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तरुणीवर बलात्कारप्रकरणी एकास अटक
पाणी पिण्याचा बहाणा करीत १९ वर्षांच्या तरुणीवर वडारवाडी येथील तरुणाने बलात्कार केला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष श्रीमंत देवकर (वय २७, रा. वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरी एकटीच असताना आरोपी पाणी पिण्याचा बहाणा करीत तिच्या घरी गेला. कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पाटील अधिक तपास करीत आहेत.