महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतल्यानंतर भांडणामध्ये त्याच्याकडून मित्राचा मृत्यू झाला.. जन्मठेपेची शिक्षा झाल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली.. तेथे आसपास जुगार खेळणारे, नशा करणारे कैद्यांचा गराडा.. पण त्याने जिद्द सोडली नाही. कारागृहातील वेळ सत्कारणी लावत पंधरा वर्षांत विविध विषयांच्या अकरा पदव्या संपादन केल्या.. त्याची वागणूक पाहून त्याची सोळाव्या वर्षीच सुटका झाली.. कारागृहात राहून अकरा पदव्या घेतल्यामुळे त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली.. विशेष म्हणजे त्याची कहाणी ऐकून एका समाजसेविकेने त्याच्याशी विवाह केला.. आता दोघेही आनंदी जीवन जगत आहेत- गोड शेवट असलेल्या चित्रपटाप्रमाणे!
एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी आहे संतोश शिंदे यांची. शिक्षा भोगून आल्यानंतर चांगले जीवन जगत असल्यामुळे पुणे पोलिसांकडून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिंदे यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. मात्र, ८ फेब्रुवारी १९९३ रोजी मित्रांसोबत झालेल्या भांडणात त्यांच्याकडून मित्राचा मृत्यू झाला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली. कारागृहात गेल्यानंतर काय कारायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. कारागृहात वेळ घालविण्यासाठी जुगार, नशा करणे यापासून ते दूरच होते. ते वेळ वाचनात घालवू लागले. कारागृहात राहून शिक्षण घेता येते याची त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी कला शाखेच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला. १९९७ मध्ये कला शाखेची पहिली पदवी घेतली.
त्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पण, वकिलीच्या शिक्षणासाठी ७० टक्के हजेरी अत्यावश्यक असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी कला शाखेच्या इतर विषयांमध्ये पदव्या घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बीएमध्ये चार, एमएमध्ये तीन पदव्या घेतल्या. मात्र, सध्या बाहेर संगणकाचे युग असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी संगणकाच्या तीन पदव्या घेतल्या. शेवटी महात्मा गांधींचे विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी अहमदाबाद येथील गांधी विचारांच्या संबंधित एक पदविका घेतली. कारागृह प्रशासनाने त्यांची वागणूक पाहून त्यांना २००८ मध्ये कारागृहातून बाहेर सोडले. त्यांनी घेतलेल्या पदव्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण, सुरुवातीला नोकरी मिळत नव्हती. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे उदय जगताप यांनी त्यांची सर्व कहाणी ड्रीम ग्रुप प्रा. लि. कंपनीचे उमेश अंबर्डेकर आणि शाम कळंत्री यांना सांगितली. त्यांनी शिंदे यांना काम करण्याची संधी दिली. समाजिक कार्यकर्त्यां मनाली वासणिक यांना शिंदे यांच्याबद्दल समजल्यानंतर त्यांनी उत्सुकतेपोटी माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. शिंदे यांची कहाणी ऐकून त्या प्रभावित झाल्या. समाजकार्यात मदत केली जाते, पण ते घरापर्यंत आणले जात नाही, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. कारागृहातून बाहेर पडलेली व्यक्ती सुधारू शकते आणि त्याला चांगली पत्नी मिळू शकते, हे दाखवून देण्यासाठी मनाली यांनी विवाह केला. आता आमचे जीवन सुरळित सुरू असून एक मुलगा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.