लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक लोणावळा शहरात दाखल होत असतात. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना लोणावळा परिसरात येण्यास बंदी आहे. मात्र, तरी देखील  अनेकजण नियम झुगारून वर्षा विहारासाठी भुशी धरण, राजमाची पॉईंट, सहारा ब्रिज, तुंगारली इत्यादी ठिकाणी येत आहेत. अशाच ४० पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी आज कारवाई केली असून, गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.

पर्यटनस्थळी जाणाऱ्या मुख्य मार्गांवर लोणावळा पोलिसांची नजर असून, या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत. प्रत्येक चारचाकी आणि दुचाकी चालकांची चौकशी केली जात आहे.

लोणावळा शहर परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक वर्षा विहारासाठी येत असतात. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करून भुशी धरण आणि इतर पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या ४० पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. हे पर्यटक मुंबईहून आलेले असून भुशी धरण, तुंगारली, राजमाची पॉईंट येथे वर्षाविहार करत असताना आढळले आहेत. त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

याबरोबरच मुंबईहून लोणावळ्यात जिल्हाबंदी नियमांचे उल्लंघन करून आलेल्या दहा राईडर्सवर देखील लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. हे सर्व तरुण उच्चभ्रू वसाहतीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ते दुचाकीवरून लोणावळा शहरात पर्यटनासाठी दाखल झाले होते. पर्यटकांनी लोणावळा परिसरात वर्षाविहारासाठी येऊन नये असे, आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले असून नियमांचे पायमल्ली करून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.