पुणे महापालिकेने पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्त संचार करता यावा, यासाठी अडथळाविरहित वातारण निर्माण करावे, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनतर्फे महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना या वेळी सादर करण्यात आले.
अपंगांना सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमन १९६६ मध्ये आवश्यक ते बदल करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार सार्वजनिक इमारतींना रॅम्प, लिफ्टची सोय, व्हिलचेअरची सोय, पकडण्यासाठी ग्रील आदींची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे संघटनेतर्फे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेखा ढवणे यांनी दिली.
शॉपिंग सेंटर, हॉटेल, बँका, एटीएम, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, बागा, सार्वजनिक शौचालये, मंगल कार्यालये, कंपनी किंवा क्षेत्रीय कार्यालये यांसारख्या ठिकाणी जाताना अपंगांना बरेच अडथळे येतात. त्यामुळे हॉटेल, नाटय़गृहे यांसारख्या ठिकाणी अडथळाविरहित सुविधा उपलब्ध नसल्यास त्यांचा परवाना रद्द करावा, मंगल कार्यालये, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, शॉपिंग सेंटर बँक आदींचे बांधकाम करताना कायद्याचे पालन केले नसल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करावी, महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्व पदपाथ, बागा, शासकीय व क्षेत्रीय कार्यालये अडथळाविरहित करावे, या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. तीन महिन्यांमध्ये या सोयीसुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.