मानसिक ताणांपासून दूर राहण्यासाठी छंद जोपासावे असे सांगितले जाते. हा छंद जोपासत असतानाच, त्याबरोबरच एक नवा उद्योग मिळाला तर! महिलांच्या हाताला काम देण्याबरोबर एखादा छंद त्यांना जोपासता यावा यासाठी ‘सुमिरो’ हा तीन महिलांचा गट कार्यरत आहे. सुप्रिया करमरकर, मीरा आठवले आणि रोहिणी वढावकर या तिघी वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या मैत्रिणींनी  ‘सुमिरो’  हा ‘क्रोशे क्लब’ पंधरा वर्षांपूर्वी स्थापन केला. आपल्या उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी ‘क्रोशे सुमिरो’ ही ‘कालातित दिनदर्शिका’ प्रकाशित केली आहे.
क्रोशे हा दोऱ्याने एका सुईवर विणण्याचा कलाप्रकार असून युरोपात लोकप्रिय असलेली ही कला आपल्या देशातही रुजली आहे. हा कलाप्रकार अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचावा, तसेच घर, कार्यालय सहजतेने सुशोभित करता यावे, तसेच उद्योजिका तयार व्हाव्यात या उद्देशाने या मंडळींनी ही दिनदर्शिका तयार केली आहे. क्रोशेमधून ‘वॉल हँगिंग, पर्स, नॅपकिन्स,लॅम्पशेड्स, किचन्स, व्हीजिटींग कार्ड होल्डर, टी कोस्टर्स, फ्रेम्स, बुकमार्क, टेबल क्लॉथ’ याबरोबरच महिलांची विविध अभूषणे, फुले, आकाशकंदील आदी वस्तू यामध्ये बनविता येऊ शकतात. ‘रेझ स्टिचेस’ सारख्या व कलाकृतींना उठाव आणणाऱ्या कलाकृतींची छायाचित्रे या दिनदर्शिकेत आहेत. विविधप्रसंगी तसेच सणांच्या निमित्ताने भेटवस्तू काय द्यायची, या प्रश्नाला क्रोशे विणकाम हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो. प्रसाद चव्हाण यांनी या दिनदर्शिकेसाठी छायाचित्रे घेण्यापासून ‘डिझाईन्स’ बनवली आहेत. सुमारे साठ कलाकृतींचा समावेश या दिनदर्शिकेमध्ये करण्यात आला असून प्रत्येक दिवसांना उद्बोधक विचारही देण्यात आले आहेत.
सुप्रिया करमरकर या जमशेटपूरहून पुण्यात आल्या असून आठवले आणि वढावकर यांची दिल्लीपासूनची मैत्री होती, ती या निमित्ताने बहरली. स्वत:ला व्यस्त ठेवण्याबरोबरच लोकांना आनंद देणाऱ्या गोष्टींची निर्मिती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि त्यातून हे सगळे उपक्रम सुरू आहेत. सामाजिक संस्थांमधील महिलादेखील त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना शिकविण्याची या गटाची तयारी आहे.