दिवाळीच्या फराळाची गोडी मनसोक्त चाखून झाल्यावर आता पुणेकरांना ‘न्यू इअर’ समारंभासाठी पुन्हा ‘फिट’ दिसण्याचे वेध लागले आहेत. थंडी वाढू लागल्यापासून विविध जिम आणि फिटनेस सेंटरमधली नवीन सदस्यांची गर्दी वाढू लागली आहे. केवळ वजन कमी करण्यासाठी नव्हे, तर बहुसंख्य लोकांचा कल ‘फिट’ राहण्यासाठी व्यायाम करण्याकडे असल्याचे निरीक्षण व्यायामशाळांच्या व्यवस्थापकांनी नोंदवले आहे.
प्रसन्न वातावरणामुळे थंडीत व्यायामाला सुरुवात करण्यासाठी उत्तम ऋतू मानला जातो. गणपती, नवरात्र आणि पाठोपाठ दिवाळी असे तीन मोठे सण झाल्यानंतर आता व्यायामशाळांमधली गर्दी वाढते आहे. परंतु केवळ सण-समारंभांच्या निमित्ताने वाढलेले वजन उतरवणे एवढाच या व्यायामप्रेमींचा उद्देश नाही. यातील बहुतेकांना चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करायचा आहे, तर काहींना ३१ डिसेंबरच्या पाटर्य़ामध्ये फिट दिसायचे आहे. व्यायामशाळांनी नवीन सदस्यांसाठी आकर्षक पॅकेजेस बाजारात आणली असून वेट ट्रेनिंग, कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, एरोबिक्स, योग या व्यायामप्रकारांबरोबर तरुणाई ‘झुंबा’ आणि ‘बॉलिवूड डान्स’ या नृत्यप्रकारांनाही व्यायामासाठी प्राधान्य देत आहेत.
‘तळवलकर्स जिम’च्या पुण्यातील व्यवसाय प्रमुख वर्षां वझे म्हणाल्या, ‘दिवाळीनंतर व्यायाम सुरू करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून शाळांच्या सुट्टय़ा संपून घरातील मुले शाळेत जाऊ लागल्यानंतर ही संख्या आणखी वाढते. तरुणांना ‘ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी’ प्रकारचे व्यायाम आवडत असल्याने झुंबा, एरोबिक्स, बॉलिवूड डान्सला चांगला प्रतिसाद मिळतो. हे व्यायामप्रकार संगीताच्या तालावर करायचे असल्याने व्यायाम करण्यातील रस टिकून राहतो. आता सर्वाचाच दिनक्रम धकाधकीचा असल्यामुळे केवळ वजन कमी करण्यापेक्षा फिटनेसला मोठे प्राधान्य दिसते.’
वजन कमी करून ते नियंत्रणात ठेवणे, एकूणच आरोग्य चांगले राखणे याबरोबरच नवीन लोकांना व मित्रांना भेटण्याचेही जिम हे एक निमित्त ठरत असल्याची माहिती ‘अ‍ॅब्ज फिटनेस अँड वेलनेस क्लब’ व्यवस्थापकीय संचालक व व्यायाम सल्लागार रेखा खंडेलवाल यांनी दिली. त्वचा तुकतुकीत राहणे, पचन चांगले राहणे, दिवसभर उत्साह राहणे यासाठीही व्यायामाचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
थंडीतल्या व्यायामापूर्वी ‘वॉर्म अप’ विसरू नका!    
थंडीतले हवामान सुखद असल्यामुळे या काळात अनेक जण व्यायाम सुरू करतात. पण थंडीत स्नायू कडक होत असल्यामुळे व्यायामापूर्वी ‘वॉर्म अप’ आणि व्यायामानंतर ‘कूल डाऊन’चे- ‘स्ट्रेचिंग’चे व्यायाम करणे गरजेचे आहे, असे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित जोशी यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘पुरेसे स्ट्रेचिंग व्यायाम न केल्यास प्रत्यक्ष व्यायामाच्या वेळी स्नायूंना दुखापत होण्याची किंवा कळ येण्याची शक्यता असते. व्यायाम करताना उबदार कपडे घालणे तसेच दिवसभर पुरेसे द्रवपदार्थ घेणे गरजेचे. थंडीत विशिष्ट व्यायामच करायला हवेत असे मुळीच नाही. आपल्या प्रकृतीस झेपणारे कोणतेही व्यायाम सुरू करता येतील.’