पोहे, पातळ पोहे,भाजके पोह्य़ाच्या दरात घट; बेसन पीठ, भाजकी डाळ महाग

पुणे : दिवाळी पंधरवडय़ावर येऊन ठेपल्यामुळे मार्केट यार्डातील गूळ आणि भुसार बाजारात खरेदीदारांची लगबग सुरू झाली आहे. चिवडय़ासाठी लागणारे पोहे, पातळ पोहे, भाजके पोह्य़ाच्या दरात यंदा घट झाली आहे. गेल्या हंगामात हरभरा डाळीचे उत्पादन कमी झाल्याने हरभरा डाळीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बेसन पिठासह भाजक्या डाळीच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या महिनापासून हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात बेसन पिठाच्या दरात ५० किलोमागे ६०० ते ६५० रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात हरभरा डाळीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. हरभऱ्याचे पीक गेल्या वर्षी कमी आले होते. त्यामुळे बेसन पिठाच्या दरात वाढ झाली. दिवाळीत बेसन लाडू तसेच अन्य पदार्थासाठी बेसन पिठाच्या मागणीत मोठी वाढ होते तसेच भाजक्या डाळीच्या दरात चाळीस किलोमागे ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे, अशी माहिती जयराज अँड कंपनीचे पोहा विभागाचे संचालक कांतीलाल गुंदेचा यांनी दिली.

यंदाच्या वर्षी भाताची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाऊक बाजारात पोह्य़ांच्या दरात ३५० ते ४०० क्विंटलमागे रुपये दरम्यान घट झाली आहे.

किरकोळ बाजारात खरेदीसाठी गर्दी

करोनाचे सावट यंदाच्या दिवाळीवर आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक तसेच किरकोळ भुसार बाजारात फारशी गर्दी नव्हती. प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून दिली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. नाना,भवानी, रविवार पेठेतील किरकोळ भुसार बाजारात दिवाळी खरेदीसाठी सध्या गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

फराळाचे जिन्नस             घाऊक बाजारातील दर           किरकोळ बाजारात

किलोचे दर

पोहे (क्विंटल)                       ३३०० ते ३६०० रुपये                 ५० ते ६० रुपये

पातळ पोहे (क्विंटल)        ४००० ते ४२०० रुपये                  ६० ते ७० रुपये

भाजके पोहे (१२ किलो)           ४९० ते ५४० रुपये                   ६५ ते ७५ रुपये

भडंग-मुरमुरा (९ किलो)         ७५० ते ८५० रुपये                १४० ते १५० रुपये

बेसन पीठ (५० किलो)            ४१०० ते ४२०० रुपये                ९० ते ९५ रुपये

भाजकी डाळ (४० किलो)       ३५०० ते ३६०० रुपये            १३० ते १४० रुपये

रवा (५० किलो )                    १३०० ते १४०० रुपये               ४० रुपये

मैदा (५० किलो)                       १२५० ते १३००                      ४० रुपये