पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळभाजी बाजार बुधवारपासून (२५ मार्च) बंद असल्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी फळभाजी खरेदीसाठी झुंबड उडाली. शहरातील महात्मा फुले मंडई, नेहरू चौक, नाना पेठ तसेच गुलटेकडीतील घाऊक फळबाजारात खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. करोनाचे सावट असताना तसेच संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी  झाल्याने पोलिसांनी सकाळी काही वेळ नरमाईची भूमिका घेतली. दुपारनंतर शहरात पुन्हा शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी मंगळवारी सकाळी आठनंतर मंडई, बाबू गेनू चौक परिसरातील फुले, कडूलिंबाची पाने तसेच अन्य साहित्यासाठी गर्दी झाली होती. करोनामुळे शहरात संचारबंदीचे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहे. बुधवारी (२५ मार्च) पाडवा आहे तसेच बुधवारपासून गुलटेकडी येथील भुसार, गुळ, फळभाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत बाजारआवारातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. पोलिसांनी शहरातील वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत र्निबध घातले आहेत. सकाळी अनेक जण दुचाकीवरून खरेदीसाठी मध्यभागात आले होते. बाजार बंद असल्याने अनेकांनी आठवडाभरासाठी पुरेल एवढय़ा फळभाज्यांची खरेदी केली.

दुपारी बारानंतर शहरात पुन्हा शुक शुकाट असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सकाळी काही वेळ पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतल्याने अनेकांना खरेदी करता आली.

फळभाजी बाजार बंद राहणार असल्याने घाऊक खरेदीदार तसेच घरगुती ग्राहकांनी मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात मोठी गर्दी केली होती. बाजारात फळभाज्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली.

काही किरकोळ विक्रेत्यांनी टंचाईची परिस्थिती असल्याचे सांगून घरगुती ग्राहकांना चढय़ा भावाने विक्री केली. किरकोळ बाजारात तीस रुपये किलो दराने पावशेर भाजीची विक्री करण्यात आली.