पुण्यात उद्यापासून दहा दिवसांचा लॉकडाउन असल्याने, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नागरिकांनी भाज्या आणि इतर वस्तूंची खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. मालाची आवक कमी आणि मागणीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे काही प्रमाणात दर वाढले असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सांगितले आहे.
पुणे शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता. आता पुन्हा मंगळवार मध्यरात्रीपासून पुढील १० दिवसांसाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाजारात काल आणि आज खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान पाले भाज्यांचे दर दुप्पट झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांच्याशी संवाद साधला, असता ते म्हणाले की, करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून बाजार दहा दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे काल आणि आज मार्केटमध्ये पाले भाज्या, फळे, फुले यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. काल १ हजार २५ तर आज ९९७ गाड्यांची आवक झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये माल आल्याने नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. या दरम्यान शासनाकडून ठरवून देण्यात आलेल्या नियमाचे पालन करून नागरिकांना आतमध्ये प्रवेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्राहकांना दुप्पट दराने वस्तु खरेदी कराव्या लागत आहे. त्यावर ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर ते म्हणाले की, बाजारात पुरवठा कमी झाल्यावर निश्चित दर वाढतात. मात्र दहा दिवसांची एकदाच खरेदीसाठी नागरिक येत आहे. यामुळे दरामध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील तीन महिने आम्ही लॉकडाउनमध्ये काढले आहेत. त्या दरम्यान हाताला काम नाही. तर दुसर्या बाजूला वस्तूंचे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे आता आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी सरकारने या वाढत्या दरांवर लक्ष देण्याची मागणी करत संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 11:42 am