दिवाळीच्या सुटीनंतर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. करोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटनस्थळे गजबजली आहेत. रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

दिवाळीची सांगता झाल्यानंतर पुणे-मुंबईतील पर्यटक शनिवार, रविवारच्या सुटीचे औचित्य साधून लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत.

गेल्या आठवडय़ापासून लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले. रविवारी लोणावळा शहरात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची कोंडी झाली.

लोणावळा नगरपरिषदेने दसऱ्याच्या मुहूर्तावर खंडाळा येथील तलावात नौकाविहार सुरू केला आहे. नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी तुंगार्ली धरण, कार्ला लेणी, श्री एकवीरा देवी मंदिर, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.

काही महिन्यांपासून बंद असलेली  लोणावळ्यातील हॉटेल,  लहान मोठे व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत.  दरम्यान, रविवारी राष्ट्रीय महामार्ग, लोणावळा शहर परिसरात झालेली कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काळजी घ्या..

करोनाचा संसर्ग कायम आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी करोना रोखण्यासाठी  दिलेल्या नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.