बारामती तालुका पोलीस ठाण्यातील घटना; परस्परविरोधी दावे

बारामती तालुका पोलीस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. मात्र, या प्रकरणात जवान आणि पोलिसांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असून, जवानाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

अशोक बापूराव इंगवले (रा. सोनगाव, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे. अशोक इंगवले सीआरपीएफचे जवान आहेत. सध्या ते सुटीवर आहेत. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा, तसेच शिवजयंती उत्सवासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यासाठी ते गेले होते. इंगवले यांना मारहाण केल्यानंतर त्यांना कोठडीत डांबून ठेवण्यात आले. इंगवले यांच्यासोबत त्यांचे बंधू निवृत्त सैनिक किशोर इंगवले हेही होते. या दोघांसह आणखी एक जण दुचाकीवरुन बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आले होते. एकाच दुचाकीवरुन तिघे जण कसे आले, अशी विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद होऊन मारहाण झाली. इंगवले यांनी याबाबत सांगितले, की, विनोद लोखंडे  नावाच्या पोलिसाने आम्हाला मारहाण करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दमदाटी करत कोठडीत नेण्यात आले.

जवानाने केलेले आरोप फेटाळले

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले म्हणाले,की  इंगवले आणि त्यांच्या बरोबर असलेली एक व्यक्ती पोलीस ठाण्यात दुचाकीवरुन आली. एकाच दुचाकीवरुन तिघे जण आल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. तेव्हा इंगवले यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांबरोबर वाद घालून धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यातील खुर्चीची तोडफोड केली, तसेच स्वत: कपडे फाडून मारहाण केल्याचा कांगावा केला. सीसीटीव्ही चित्रीकरणात या बाबी आढळून आल्या आहेत. अशोक इंगवले सुटीवर असताना त्यांनी गणवेश परिधान करण्याचे कारण काय, असा पोलिसांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. चित्रीकरणाची पडताळणी केल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.    – धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका