जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी गेलेल्या एका सीआरपीएफच्या जवानाला बारामती पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत या जवानाचे कपडे फाटले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, अशोक इंगवले (रा. सोनगाव) असे या मारहाण करण्यात आलेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव असून तो ११८ बटालिअनमध्ये कार्यरत आहे. इंगवले शहीदांच्या श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांना बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यात सात तास बसवून ठेवण्यात आले. दारु पिऊन तिघांना दुचाकीवर घेऊन येत रागाच्या भरात त्याने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत तोडफोड केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा धिंगाणा सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

मात्र, आपण दारु प्यायलो नाही, आपली वैद्यकीय तपासणी केल्यास सत्य समोर येईल असे इंगवले यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, यावरुन समाधान न झाल्याने १६ पोलिसांनी मिळून इंगवले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचे कपडेही फाटले आहेत.