नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून रात्र जमावबंदी लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी प्रसृत के ले. त्यानुसार शुक्रवारपासून (२५ डिसेंबर) ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी नववर्ष स्वागतासाठी ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ग्रामीण भागातही रात्र संचारबंदी लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना विनंती के ली होती. त्यानुसार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील पर्यटनस्थळी २५ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळेपर्यंत देशमुख यांनी जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळी रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदीचे आदेश गुरुवारी प्रसृत केले.

आरक्षण के लेल्या पर्यटकांचा हिरमोड

नाताळनिमित्त जोडून आलेल्या सुटय़ांमुळे अनेक पर्यटकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह (एमटीडीसी) खासगी निवासस्थाने आरक्षित के ली होती. एमटीडीसीच्या पुणे विभागातील सर्व निवासस्थानांचे आरक्षण फु ल झाले आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्र जमावबंदीचे आदेश प्रसृत करण्यात आल्याने आरक्षण के लेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. एमटीडीसी निवासस्थानांच्या परिसरात पर्यटकांसाठी सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ते कार्यक्रम देखील रद्द करण्यात आल्याचे एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.

कोणत्या ठिकाणी रात्र जमावबंदी

तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगर परिषदांचा भाग, तळेगाव आणि चाकण औद्योगिक वसाहत, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क या भागात २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लोणावळा, अ‍ॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी धरण, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके , याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने (रिसॉर्ट) या ठिकाणी नाताळ आणि नववर्षांनिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथेही रात्र जमावबंदी लागू करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद के ले आहे.