अनेक उपाहारगृहांमध्ये ‘लेमन टी’, ‘ब्लॅक कॉफी’ला ग्राहकांची पसंती

पुणे : दूधबंद आंदोलनामुळे चहा आणि कॉफी करण्यासाठी दुधाचा आखडता हात घेण्याची वेळ गुरुवारी शहरातील अमृततुल्य आणि हॉटेलचालकांवर आली. अनेकांनी लेमन टी आणि ब्लॅक कॉफी हे पर्याय अनुभवून पाहिले. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘येवले चहा’च्या सर्व शाखा त्यांच्याकडे दूध उपलब्ध असल्यामुळे सुरू होत्या.

दुधाला प्रतिलीटर पाच रुपये वाढवून मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या दूधबंद आंदोलनाचे परिणाम आता चार दिवसांनंतर दिसू लागले आहेत. पूर्वीचा साठा आणि अल्प प्रमाणात होणारे दूध संकलन यातून पुणेकरांचे तीन दिवस कसेबसे पार पडले. मात्र, गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी चितळे आणि कात्रज डेअरी यांचा दूध पुरवठा बंद पडल्यामुळे शहरात दुधाचा तुटवडा जाणवू लागला. अनेकांना घरगुती वापरासाठी दूध उपलब्ध होऊ शकले नाही, तर दुधाचा पुरवठा होऊ शकला नसल्याने बऱ्याच अमृततुल्यचालकांना सुट्टी घ्यावी लागली. घरच्या जनावरांचे दूध आहे किंवा स्थानिक गवळी दूध घालतात अशा अमृततुल्यचालकांकडे चहा मिळत होता.

केळकर रस्त्यावरील नागनाथ अमृततुल्यमध्ये सकाळी गवळय़ाने घातलेल्या रतिबाच्या दुधाचा वापर करण्यात आला. नारायण पेठेतील आरेच्या दुकानातून १५ लीटर दूध आणून चहा केला गेला, असे या नागनाथ अमृततुल्यचे मालक कुंदन दवे यांनी सांगितले.

‘रूपाली’मध्ये नऊ वाजल्यानंतर चहा

सकाळच्या व्यायामानंतर फग्र्युसन रस्त्यावरील रूपालीमध्ये गरम चहा घेण्याचा अनेकांचा शिरस्ता आहे. त्यानुसार सकाळा साडेसात वाजल्यापासून बॅडमिंटन खेळून आलेल्यांपासून युवक-युवती, सेवानिवृत्तिधारक आणि भिशी ग्रुपच्या महिलांपर्यंत सगळे ग्राहक चहाची वाट पाहात थांबले होते. ७० वर्षांत प्रथमच असे रूपाली सर्वानी अनुभवले, असे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. शेजारी असलेल्या अमृततुल्यमधून चहा आणून मी ‘रूपाली’मध्येच चहा घेतला,  मात्र, नऊ वाजता दुधाच्या बरण्या आल्या आणि त्यानंतर चहा करून ग्राहकांना देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा दुधाचा रास्त दर मिळायला हवा याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. शहरातील ग्राहक एक लीटर दुधासाठी किमान पन्नास रुपयांहून अधिक दर देतात, मात्र शेतकऱ्यांपर्यंत तुटपुंजे पैसे पोहोचत असतील तर दोषींवर कारवाई केली पाहिजे.

– धनंजय भोसले, महाविद्यालयीन युवक