राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षा घेतली, तरीही व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या परिस्थितीत फारसा फरक पडण्याची शक्यता नसून नुकत्याच झालेल्या प्रवेश परीक्षेमध्ये २०० पैकी १५८ गुण हे सर्वाधिक आहेत, तर १४० गुणांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एक टक्क्य़ापेक्षाही कमी आहे. त्यामुळे नावाजलेल्या महाविद्यालयांचे कट ऑफही या वर्षी घसरणार आहेत.
राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी या वर्षी राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला. या परीक्षेसाठी राज्यातून ४९ हजार २७६ विद्यार्थी बसले होते. शून्य पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत पात्र ठरवण्यात आले. त्यानुसार ४९ हजार २५२ विद्यार्थी पात्र ठरले, तर २४ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. मात्र, या परीक्षेची गुणवत्ता घसरल्याचे दिसत आहे.
एकूण २०० गुणांच्या या परीक्षेत १५८ गुण हे सर्वाधिक आहेत. राज्यातील ४ विद्यार्थ्यांना १५८ गुण मिळाले आहेत. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या ही ८० गुणांपेक्षाही कमी गुण मिळालेल्यांची आहे. पात्र ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास ७५ टक्के विद्यार्थी हे ऐंशीपेक्षाही कमी गुण मिळालेले आहे. ८० ते १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही साधारण ५३ टक्के, तर १०० ते १४० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १० टक्के आहे. १४० पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १ टक्क्य़ापेक्षाही कमी आहे.
प्रवेश परीक्षेतील गुणांच्या या घसरगुंडीमुळे या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या नावाजलेल्या महाविद्यालयांचे कट ऑफही घसरणार आहेत. मुळातच उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थीच कमी असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ या वर्षीही येण्याची शक्यता आहे.