पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविण्यात आल्याप्रकरणी हाँगकॉँग येथील हेनसेंग बँकेत चोरटय़ाने जमा केलेल्या रकमेपैकी ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये पहिल्या टप्यात बँकेला परत करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणात पाठपुरावा करण्यात येत होता. सायबर चोरटय़ांनी हाँगकाँग येथील हेनसेंग बँकेतील एका खात्यात १३ कोटी ९२ लाख रुपये जमा केले होते. सायबर पोलिसांकडून बँकेतील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला होता  तसेच हाँगकाँग पोलिसांचे साहाय्य या प्रकरणात घेण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास हाँगकाँग पोलीस दलातील अधिकारी लूंग यांच्याकडे देण्यात आला होता. परराष्ट्र दूतावासाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्यात आली होती तसेच काँसमॉस बँकेकडून हाँगकाँग येथील न्यायालयात दाद मागण्यात आली होती. हेनसेंग बँकेकडून गोठविण्यात आलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्यात ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.