पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रन्समवेअरने अटॅक केल्याचं उघड झाल आहे. त्यातील डेटा इनक्रिप्ट करण्यात आला असून, तो हवा असल्यास अज्ञात बिटकॉइनची मागणी हॅकरकडून करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात परदेशी हॅकरचा हात असल्याचा संशय सायबर पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेकी करून हा हल्ला करण्यात आला आहे, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या अस्तित्व हॉल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाची नुकतीच सुरुवात झाली होती. अधिकाऱ्यांनी पूर्ण काम सुरू केलं नव्हते. सॉफ्टवेअर लॉन्च करण्याच्या अगोदरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हर मधून डेटा इनक्रिप्ट केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सायबर हल्ला कडून माहिती चोरल्यामुळे ५ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. चोरी केलेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो, असं सायबर पोलिसांनी सांगितलं आहे. हॅकरने हा डेटा इनक्रिप्ट केला असून तो पुन्हा त्यांनाच डिस्क्रिप्ट करता येतो. त्यामुळे ते बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणीची मागणी करत आहेत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आहे. या प्रकरणी टेक महिंद्राचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लाठी यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली आहे.

पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, हा प्रकार २६ फेब्रुवारी रोजी घडला आणि या प्रकरणी मंगळवारी तक्रार देण्यात आली. त्यानंतर घटना उजेडात आली. मात्र, तक्रार देण्यास विलंब का झाला, या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामुळे तब्बल ५ कोटींचे नुकसान झाल्याचं ही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नेमका कोणता आणि किती महत्वाचा डेटा इन्क्रीप्टकेला गेला याची पूर्णतः माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.