सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या परदेशात स्थायिक असलेल्या मुलाच्या बँक खात्यातून सायबर भामटय़ाने नऊ लाख ९८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. बंडगार्डन रस्त्यावरील एका बँकेत ही घटना घडली.
रवींद्रनाथ मिश्रा (वय ६७, रा.क्लोव्हर टेरेस, मंगलदास रस्ता) यांनी या संदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिश्रा हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. त्यांचा लहान मुलगा आनंद हा हॉलंड येथील अ‍ॅमेस्टरडॅम येथे वास्तव्यास आहे. आनंद याचे बंडगार्डन रस्त्यावरील अ‍ॅक्सीस बँकेत खाते आहे. आनंद याच्या नावे अ‍ॅक्सीस बँकेत ३० लाख ५९ हजार ८९४ रुपयांच्या ठेवी आहेत.
मिश्रा हे बुधवारी (६ जानेवारी) अ‍ॅक्सीस बँकेत गेले होते. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्याला व्यवहाराच्या नोंदी भरून देण्यासाठी खातेपुस्तक दिले. उशीर होत असल्याने मिश्रा हे खातेपुस्तक तेथेच ठेवून शिवाजीनगर न्यायालयात एका कामनिमित्त गेले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिश्रा हे बँकेत खातेपुस्तक आणण्यासाठी असता, मुलगा आनंद याच्या ३० लाख ५९ हजार ८९४ रुपयांच्या सात ठेवी (फिक्स डिपॉझिट) मोडून ही रक्कम एका वेगळ्याच खात्यात वर्ग करण्यात आल्याचे नोंदींवरून त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मिश्रा यांनी तातडीने आनंद याच्याशी संपर्क साधला आणि पैसे कोणाला दिले का, अशी विचारणा केली. आनंदकडून नकार आल्यावर भामटय़ांनी गेल्या महिन्यात २३ आणि २४ डिसेंबर रोजी आनंद यांचा ई-मेल आयडी हॅक करून त्यांच्या खात्यातून नऊ लाख ९८ हजार रुपये काढल्याचे उघडकीस आले. मिश्रा यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शनिवारी (९ जानेवारी) तक्रार दिली.  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी सांगितले.