घरपोच वस्तू पोहोचविण्याच्या फसव्या जाहिराती

पुणे : टाळेबंदीत सायबर चोरटय़ांनी घरपोच खाद्यपदार्थ, मद्य तसेच जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे आमिष दाखविणाऱ्या फसव्या जाहिराती (लिंक) तयार केल्या आहेत. त्या माध्यमातून सायबर चोरटे सामान्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून फसव्या जाहिरातींवर  नजर ठेवण्यात आली आहे.

खासगी आयुर्विमा कंपनी, बँक, घरपोच अन्नपदार्थ, ऑनलाइन गेम असे फसवे संदेश पाठविण्यात येत आहेत. टाळेबंदीत नागरिक घरीच आहेत. फसव्या जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये तसेच आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. फसव्या जाहिरातीला प्रतिसाद दिल्यास चोरटे बँकेची गोपनीय माहिती घेऊन रोकड लांबवू शकतात.

टाळेबंदीत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा, लिंक प्रसारित करण्यात येत आहे.  सायबर चोरटे तसेच हॅकर्स सक्रिय झाले आहे. बँक तसेच एखाद्या कंपनीच्या नावाने पाठविण्यात आलेली लिंक पडताळून पाहावी. त्यानंतर पुढील व्यवहार करावेत, असे आवाहन सायबर तज्ज्ञ अ‍ॅड. गौरव जाचक यांनी सांगितले.

फसव्या संदेशाद्वारे सामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार घडतात. एखाद्या कंपनीच्या नावाने संदेश पाठविण्यात आला असेल त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खातरजमा करावी. फसवे संदेश तसेच आमिषांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी बँकेची गोपनीय माहिती देऊ नये.

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, आर्थिक, सायबर गुन्हे शाखा

मद्य विक्रीचा संदेश

टाळेबंदीत मद्य विक्रीची दुकाने बंद होती. काही दिवसांपूर्वी नागरिकांना घरपोच मद्य विक्री केली जाईल, असे संदेश पाठविण्यात आले होते. त्यामाध्यमातून चोरटय़ांनी नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार उघड झाले होते.