X

स्मार्ट सिटीतील सायकलची मोडतोड

काही दिवसांपूर्वी सायकल थांब्यांवर मोठय़ा प्रमाणात दिसणाऱ्या सायकलही गायब होत आहेत.

वापर झाल्यावर फेकून देणे, कुलूप तोडण्याचे प्रकार वाढले

खासगी वाहनांची दिवसागणिक वाढत असलेली संख्या, वाहतुकीची कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या भाडे तत्त्वावरील सायकल योजनेला सर्व घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी सायकल वापराच्या काही विकृतीही पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. एखाद्या चांगल्या योजनेची कशी वाट लावली जाते याची काही उदाहरणे या योजनेत दिसत आहेत. या सायकलची मोडतोड करणे, वापर झाल्यावर त्या नाल्यांमध्ये किंवा नदीपात्रात फेकून देणे, सायकलचे कुलूप तोडणे असे प्रकार सातत्याने सुरु आहेत.

स्मार्ट सिटी प्रशासन आणि महापलिकेकडून अशा प्रकारांबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे या प्रकारात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सायकल थांब्यांवर मोठय़ा प्रमाणात दिसणाऱ्या सायकलही गायब होत आहेत. त्यामुळे या चांगल्या योजनेत त्रुटी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

शहराच्या वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले. खासगी वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे आणि अरुंद रस्ते, सार्वजनिक वाहतुकीची कोलमडलेली सेवा आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भाडेतत्त्वावरील सायकल योजनेचा पर्याय पुढे आला. कित्येक वर्ष त्यावर चर्चा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ही योजना प्रत्यक्षात सुरु झाली. अल्प भाडे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वापरण्यास सुलभ असल्यामुळे सायकली पुणेकरांमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेली ही सेवा शहराच्या अनेक भागात सुरू करण्यात आली. पण या योजनेला काही पुणेकर नागरिकांकडूनच खो घालण्यात येत आहे, याची काही उदाहरणे दिसत आहेत. प्रारंभी काही दिवसांपर्यंत सायकलींची चोरी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता सायकलची मोडतोड करणे, कुलपे तोडणे, सायकल नाल्यात किंवा नदीपात्रात फेकून देणे असे प्रकार सुरु झाले आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनाही कोथरूड परिसरातील एका वस्तीमध्ये सायकली लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्याबाबत त्यांनी महापालिका, स्मार्ट सिटी आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पुलाजवळ नदीपात्रात सायकल फेकून दिल्याचे आढळून आले आहे.

यासंदर्भात बोलताना खर्डेकर म्हणाले की, सायकलची मोडतोड करणे, त्या नाल्यात फेकून देणे, कुलपे तोडून सायकल वस्तीमध्ये ठेवणे असे प्रकार दिसून आले आहेत. त्याबाबत माहिती घेतली असता काही अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले.

या कृत्यात मुले सहभागी असल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली नाही. मात्र एकूणच सायकलच्या वापराबाबतची विकृती सातत्याने पुढे आली आहे. या लोकप्रिय योजनेसंदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गणेश मंडळांची, स्थानिक शांतता समितीच्या सदस्यांची मदत घेता येऊ शकते.

योजनेत त्रुटी समोर

दरम्यान, येरवडा परिसरातही असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. स्थानिक नगरसेवकांनी एका ठिकाणच्या सायकली महापलिकेकडे पुन्हा हस्तांतरित केल्या होत्या. तर स्मार्ट सिटी प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही याबाबत हतबलता व्यक्त केली होती. जीपीआरएस तंत्रत्रान असतानाही असे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात सायकल उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा सुरु असून ठोस उपाययोजा करण्यात येतील, असा दावा स्मार्ट सिटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. मात्र त्यानंतरही काहीच हालचाल न झाल्यामुळे चांगल्या योजनेत त्रुटी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

महापालिका आणि स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात भाडे तत्त्वावरील सायकल योजनेला प्रारंभ करण्यात आला आहे. सायकल योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच सायकलची मोडतोड करण्याचे प्रकारही वाढले आहेत.