केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने (महाराष्ट्र टय़ुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) १६ ते २७ सप्टेंबर या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी पर्यटन पर्व साजरे करण्यात येणार आहे. त्यानुसार एमटीडीसी पुणे विभाग कार्यालयाकडून जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शनिवारवाडा ते लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठापर्यंत गुरुवारी सायकल फेरी काढण्यात आली.

पर्यटन वृद्धी आणि जनजागरण याकरिता ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आयएचएम संस्थेचे प्रमुख संदीप तापकीर, रेल्वे प्रशासनाचे पाटील या वेळी उपस्थित होते. संगणकीय परिवर्तनामुळे पर्यटन क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहेत. या बदलांचा पर्यटन क्षेत्राला लाभ होण्यासाठी आणि पर्यटन पर्वाच्या निमित्ताने राज्यातील गड किल्ले, समुद्र किनारे, निसर्ग, खाद्य संस्कृती, लोककला, हस्तकला आणि इतिहास यांची माहिती व्हावी, त्याचा आस्वाद पर्यटकांना घेता यावा आणि राज्यातील पर्यटन वाढीला चालना मिळावी, यासाठी हे पर्व उपयोगी ठरेल, असे हरणे यांनी या वेळी सांगितले.