नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने अखेर सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. गोवा ओलांडून तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांमध्ये दाखल झाला. मात्र, सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘अशोबा’ चक्रीवादळाचा त्याच्या पुढील प्रवासावर विपरीत परिणाम होणार असून, राज्याच्या अंतर्गत भागात पोहोचण्यासाठी त्याला किमान चार-पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात सोमवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या.
मान्सून सामान्यत: ५ ते ७ जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात प्रवेश करतो. त्या तुलनेत तो राज्यात दाखल व्हायला एक-दोन दिवस उशीर झाला. मात्र, सध्या अरबी समुद्रात दाखल झालेल्या अशोबा नावाच्या चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसात त्यांची प्रगती झालीच तर केवळ किनाऱ्याच्या दिशेने होईल. राज्याच्या अंतर्गत भागात ते पोहोचणार नाहीत, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मान्सून सोमवारी मध्य अरबी समुद्रात पुढे सरकला. त्याने गोवा व्यापला. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरीपर्यंत आघाडी घेतली. याशिवाय कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकातही  तो पुढे सरकला. त्याची उत्तर सीमा रत्नागिरी, कर्नाटकमध्ये शिमोगा, म्हैसूर, तामिळनाडूमध्ये सालेम, कुडलोर अशी आहे. दरम्यान, राज्याच्या रत्नागिरी येथे सोमवारी दिवसभरात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या. त्यात लोहगाव-पुणे (५२ मिलिमीटर), महाबळेश्वर (०.२), नाशिक (२), भीरा (३) यांचा समावेश आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबरच विदर्भातील उष्णतेची लाट ओसरली आहे. तेथे नागपूर शहरात सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अशोबा वादळाने पावसाचे ढग पळवले
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशोबा चक्रीवादळाने मान्सूनचे ढग पळवून नेले आहेत. ते सोमवारी सकाळी मुंबईपासून ५९० किलोमीटर अंतरावर, तर गुजरातमधील वेरावळ किनाऱ्यापासून ४७० किलोमीटर अंतरावर होते. त्याची तीव्रता वाढत असून, त्यातील वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १२० किलोमीटर इतका वाढण्याची शक्यता आहे. ते महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनाऱ्यावर न येता पुढे ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता गुरुवारनंतर कमी होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर जमिनीवर पोहोचण्याआधीच शुक्रवारी हे वादळ शमेल. मात्र, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर मोठा पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम काय?
मान्सूनच्या काळात चक्रीवादळ निर्माण झाले की त्याचा मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होतो. या वेळीसुद्धा अरबी समुद्रातील अशोबा वादळामुळे तो परिणाम अपेक्षित आहे. मात्र, त्याच वेळी बंगालच्या उपसागरात पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती असल्याने या वादळाचा पावसावर खूप जास्त परिणाम संभवत नाही. मात्र, मान्सून पुन्हा योग्य पद्धतीने सक्रिय होण्यासाठी किमान चार-पाच दिवस लागतील, असे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले.
‘अशोबा’चा अर्थ
अशोबा हे श्रीलंकेने दिलेले नाव आहे. त्याचा अर्थ नकोसा असलेला किंवा अशुभ असा असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना कोणती नावे द्यायची याची यादी करण्यात आली आहे. या यादीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, थायलंड आणि ओमान या आठ देशांनी दिलेल्या नावांचा समावेश आहे. या यादीतील नावे एकापाठोपाठ एक अशा क्रमाने वापरली जातात.