शहर, जिल्ह्यात १५०० वीजखांब कोसळले; वाहिन्या तुटून लाखो नागरिकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील वीजयंत्रणेला निसर्ग चक्रीवादळाचा अभूतपूर्व तडाखा बसला आहे. वीजयंत्रणेचे सर्वाधिक नुकसान चक्रीवादळाच्या मार्गाच्या परिघात असलेल्या मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत झाले आहे. शहर परिसर आणि जिल्ह्यात एकूण दीड हजारांच्या आसपास वीजखांब वादळामुळे कोसळले असून, अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या पडून वीजवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. महावितरणकडून पावसातच दुरुस्तीची कामे सुरू करून बहुतांश भागात वीज सुरळीत करण्यात आली. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणची वीज गायब होती.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बुधवारी पहाटेपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली होती. सकाळनंतर वाऱ्याचा वेग वाढला आणि सोसाटय़ाचा पाऊस सुरू झाला. त्याचा फटका वीजयंत्रणेला बसला. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी उच्चदाब वीजखांब उन्मळून पडले. काही ठिकाणी ते वाकले. खांबावरील वीजवाहिन्यांवर झाडे आणि फांद्या पडल्याने त्या तुटल्या. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव, बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड आदी भागात या घटना घडल्या. काही ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरून वीजपुरवठा खंडित झाला.

पुणे परिमंडलासह बारामती परिमंडलात येणाऱ्या या विभागांमधील महावितरणचे कर्मचारी आणि अभियंत्यांकडून तातडीने यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाऊस आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी हानी झाल्याने या कामात अडथळे निर्माण झाले होते. २४ तासांच्या कालावधीत शहरांसह ग्रामीण विभागातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. काही ठिकाणी अद्यापही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने वीज पूर्ववत होऊ शकली नव्हती.

पुणे, पिंपरीत काही ठिकाणी अद्यापही वीज गायब

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये बहुतांश वाहिन्या भूमिगत आहेत. काही ठिकाणी लघु आणि उच्चदाब वाहिन्यांचे खांब आहेत. त्यातील शंभरच्या आसपास खांब वादळात कोसळले. त्याचप्रमाणे भूमिगत वाहिन्या आणि फिडरमध्ये पाणी शिरून वीज गायब झाली. आंबेगाव, सहकारनगर आणि मार्केट यार्डमधील काही भाग, जनता वसाहत, बाणेरमधील काही भाग, येवलेवाडीमधील फॉर्च्युन सृष्टी, फॉर्च्युन शुभम, हडपसरमधील गंगा व्हिलेज, विमाननगर, विश्रांतवाडीमधील काही सोसायटय़ा आदी भागांमध्ये वीजपुरवठा गुरुवापर्यंत खंडित होता. अनेक भागांत संध्याकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीची कामे सुरू होती. शहरात बुधवारी रात्रीपर्यंत ८५ पैकी ८४ वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी हिंजवडी, वाकडचा काही भाग, खराळवाडीमधील काही सोसायटय़ा, पिंपळे सौदागरचा काही भाग तसेच भोसरीमधील काही भागात वीजपुरवठा सुरू करण्यासाठी दुरुस्ती कामे सुरू होती.

मावळ, खेड, जुन्नरमध्ये सर्वाधिक नुकसान

निसर्ग चक्रीवादळाच्या मार्गाच्या परिघात असलेल्या मावळ, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांतील वीजयंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे. या चार तालुक्यांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार तब्बल १३५० वीजखांब वादळामुळे कोसळले आहेत. त्याचप्रमाणे शेकडो ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत. ३८५ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडल्याने ७९४ गावांमधील तब्बल साडेपाच लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. या सर्वामध्ये महावितरणचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामध्ये महापारेषण कंपनीच्या पाच अतिउच्चदाब वाहिन्याही तुटल्या.