ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी सहाच्या दरम्यान पुणे सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. येथे न्यायालयाने डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, कोर्टाला फसवले असल्याचे शुक्रवारीच कोर्टाने म्हटले होते. तसेच अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले होते. त्यामुळेच डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ज्यानुसार आज पहाटे त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्याता आली होती.

डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती. त्यामुळे गेले काही महिने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळत होते. अखेर उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी यांना देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण शुक्रवारी काढून घेण्यात आले आणि कुलकर्णी यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी यांना शनिवारी पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली.

एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभे करावेत असे म्हणत याआधीच कोर्टाने डीएसकेंना फटकारले होते. तसेच लोकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात असे म्हणतही कोर्टाने डीएसकेंना झापले होते. शुक्रवारी मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास उरला नाही असे कोर्टाने म्हणत कारवाईसाठी तयार राहण्याचा इशाराच दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मी काहीही झाले तरीही लोकांचे पैसे बुडवणार नाही, क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे उभे करेन अशी आश्वासने डी एस कुलकर्णी यांनी वारंवार दिली. मात्र ते कोर्टात पैसे भरण्यात अपयशी ठरले. तसेच त्यांनी दिलेली आश्वासनेही त्यांना पाळता आली नाही. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डी एस कुलकर्णी यांना शोधण्यासाठी पथके तयार केली होती. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार हे उघड होते. अखेर आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली आहे.