ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना शनिवारी पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कुलकर्णी यांच्या वकिलांकडून न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे डी एस कुलकर्णी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होईल.

आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबई येथील घरावर आणि कार्यालयांवर छापा टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला होता. तर कागदपत्रांची, हार्डडिस्कची छाननी करत पोलिसांनी डीएसकेंच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. मुदत ठेवींवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखविल्याने डीएसकेंच्या विविध कंपनीत नागरिकांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली होती. ठेवीदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याज परत मिळत नसल्याने त्यांनी डीएसकेंकडे पाठपुरावा करत पैशांची मागणी केली. मात्र, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे अद्याप परत न केल्याने पोलिसांनी डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाकरिता एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती.