तीव्र चुरस आणि नाटय़मय घडामोडीनंतर पिंपरी पालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीने माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांची वर्णी लावली आहे. संख्याबळाअभावी विरोधकांचा उमेदवारी अर्ज नसल्याने आसवानी बिनविरोध निवडून येणार असून त्यावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे. ज्याला कोणतेही पद मिळाले नाही, त्याचा विचार करणार, असे ‘कारभारी’ सांगत राहिले. मात्र, जिजामाता प्रभागाची पोटनिवडणुकीची जागा खेचून आणल्याची बक्षिसी देत पिंपरी बाजारपेठेचे ‘राजकारण’ डोळय़ांसमोर ठेवून उपमहापौरपद भूषवले असतानाही अजितदादांनी आसवानींच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
अध्यक्षपदासाठी शनिवारी (५ मार्च) निवडणूक होत आहे, त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीची उत्कंठा कायम होती. अखेर, अजित पवार यांच्या आदेशानुसार आसवानी यांचे नाव जाहीर करण्यात आले. स्थायी समितीत असलेले राष्ट्रवादीचे सर्व १२ सदस्य अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा होती. नारायण बहिरवाडे यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. तथापि, त्यांच्या नावाला नेतेमंडळींकडून तीव्र विरोधही होता. अन्य इच्छुकांनी वेगवेगळय़ा मार्गानी अजितदादांकडे ‘लॉबिंग’ केले होते. तथापि, िपपरीच्या जिजामाता प्रभागातील पोटनिवडणुकीत अरुण टाक यांना निवडून आणण्यात आसवानी यांची महत्त्वाची भूमिका आणि िपपरी बाजारपेठेतील आगामी काळातील राजकारण डोळय़ांसमोर ठेवून अजितदादांनी त्यांची निवड केली. येत्या निवडणुकीत आसवानी यांच्यावर पिंपरी बाजारपेठेतील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.