टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी विठ्ठलनामाचा गजर करीत पायी पंढरपूरला जाणाऱ्या पांडुरंगभक्तांकडून मानवतेची पूजारी समाजसेवकाचा गौरव झाला. वारकरी संप्रदायातर्फे दादा जे. पी. वासवानी यांना ‘संत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांनी गुरुवारी सकाळी साधू वासवानी मिशन येथे भेट देत साधू वासवानी यांच्या समाधीसमोर भजन केले. त्यानंतर दादा वासवानी यांचे वास्तव्य असलेल्या कुटीमध्ये हा हृद्य सोहळा झाला. ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते दादा वासवानी यांना ‘संत रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पांडुरंगाची मूर्ती प्रदान करण्यात आली. दादांनी वारीचे प्रतीक असलेली वीणा आणि तुळशी वृंदावन हाती घेतले.

‘फक्त भक्त बनू नका. तर भक्तांचा भक्त बना’, असा संदेश देत दादा वासवानी यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात. मी तुम्हा सर्वासमोर नतमस्तक होत आहे. वेगवेगळ्या प्रांतातून आलेले वारकरी सर्वधर्म समभावाचा संदेश देत आहेत.वारकरी संप्रदाय असाच मोठा होत राहू दे, अशी भावना वासवानी यांनी व्यक्त केली.