न्यायालयाच्या आदेशाचे सरसकट उल्लंघन करीत थरावर थर

२० फुटांपेक्षा अधिक उंचीची हंडी उभारू नये या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सरसकट उल्लंघन करीत थरावर थर रचत शहर आणि उपनगरांतील शेकडो मंडळांनी गुरुवारी दहीहंडी ‘साजरी’ केली. मंडळांनी ध्वनिप्रदूषणाचे नियमही धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र दिसून आले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने संभाव्य उमेदवारांनी हात सैल करीत शक्तिप्रदर्शनाची संधी साधल्याने उत्सवाला उन्मादाचे स्वरूप आले होते.

दहीहंडी उत्सवामध्ये २० फुटांपेक्षा अधिक उंच हंडी उभारली जाऊ नये आणि हंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, दहीहंडी साजरी करताना शहरातील आणि उपनगरातील बहुतांश मंडळांनी या आदेशाचे सरसकट उल्लंघन केल्याचेच दिसून आले. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ा मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत दहीहंडी उभारली होती. दणदणाट करणारे डीजे आणि ध्वनिवर्धकाच्या उंचच उंच भिंती, भरीस भर म्हणून ढोल-ताशा पथकांच्या सरावाचा निनाद, गगनभेदी फटाक्यांची झालेली आतषबाजी, तारे-तारकांच्या उपस्थितीचे आकर्षण अशा कारणांनी पारंपरिक दहीहंडीच्या सणाचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘इव्हेंट’ करून टाकला होता.

दहीहंडी ही गणेशोत्सवाची रंगीत तालीम समजली जाते. गोकुळ अष्टमीचा मुहूर्त साधून बुधवारी शहरातील अनेक मंडळांनी मंडप उभारणीच्या कामाची सुरुवात केली. त्यामुळे होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये सायंकाळपासून सुरू झालेल्या दहीहंडीच्या तयारीच्या लगबगीने भरच पडली. दहीहंडी उभारताना २० फूट म्हणजे नेमके किती उंच याचे भान कोणत्याच मंडळाने ठेवले नाही. त्यामुळे पथदिव्यांच्या उंचीपेक्षाही हंडय़ा उंचीवर बांधण्यात आल्या होत्या. दणदणाट करणारे डीजे आणि ध्वनिवर्धकाच्या उंचच उंच भिंतींनी नागरिकांच्या काळजाची धडधड वाढली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांसह भावी उमेदवारांनी ‘होऊ दे खर्च’ ही भूमिका घेतल्याने दहीहंडीला ‘ऐश्वर्य’ प्राप्त झाले होते.

कोथरुड, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, हडपसर, कात्रज या उपनगरांमधील मंडळांनी लावलेल्या डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास झाला. रुग्णालये आणि शांतता क्षेत्रातील परिसरात अनेक ठिकाणी गाणी लावून धिंगाणा सुरूच होता. रस्त्यांची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करीत दहीहंडी साजरी केली.

कमिन्स महाविद्यालयापासून वारजाकडे आतील बाजूने जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे तेथून नेहमी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरून जावे लागले. परिणामी त्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सनसिटीमध्ये आतील बाजूला अनेक नव्या-जुन्या मंडळांनी दहीहंडीनिमित्त डीजे लावला होता व रस्त्याची एक बाजू बंद केली होती. कोथरुडमध्ये मुख्य रस्त्यावर तुरळक गर्दी होती. मात्र, सोसायटी, कॉलनी, गल्ल्यांमध्ये दहीहंडीचा ज्वर मोठय़ा प्रमाणात होता.

  • २० फुटांपेक्षा अधिक उंच हंडी उभारू नये या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
  • दणदणाट करणारे डीजे आणि ध्वनिवर्धकाच्या भिंतीमुळे ध्वनिप्रदूषणाचे निकष धाब्यावर
  • शहर आणि उपनगरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी
  • मंडळांपुढे झालेल्या ढोल-ताशा पथकांचे सराव वादनामुळे गोंगाटामध्ये भर
  • बेधुंद नाचणारी तरुणाई आणि डोळे दिपवून टाकणारा विविध रंगी दिव्यांचा प्रकाशझोत
  • ‘सैराट’फेम ‘आर्ची’ िरकू राजगुरू हिच्या उपस्थितीने वारजे परिसरात तोबा गर्दी आणि वाहतूक कोंडी
  • आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमाप खर्च आणि मोठय़ा रकमांची बक्षिसे

‘आवाजी’ कहर!

नियमानुसार रहिवासी भागात आवाजाची मर्यादा दिवसा ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल असायला हवी. शांतता क्षेत्रात तर ही मर्यादा दिवसा ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल अशी घालून देण्यात आली आहे. दहीहंडीचे निमित्त साधून या सर्व मर्यादा धुडकावून लावत मंडळांनी ‘आवाजी’ कहर केला. ‘सिटिझन सायन्स नेटवर्क’ या खासगी संस्थेच्या सदस्यांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळात शहरात ठिकठिकाणच्या दहीहंडी मंडळांच्या परिसरात जाऊन आवाजाची पातळी मोजली. पेठांमध्ये बाबू गेनू चौकात ९२ डेसिबल, शास्त्री रस्त्यावर ९४ डेसिबल, शिवाजीनगरला ९६ डेसिबल, अप्पा बळवंत चौकात ९७ डेसिबल, लक्ष्मी रस्त्यावर काकाकुवा मॅन्शनजवळ ९८.५ डेसिबल, डेक्कन जिमखाना भागात ९६ डेसिबल, पत्र्या मारुतीजवळ ९७.३ डेसिबल, बेलबाग चौकात ९८.६ डेसिबल, असा ढणढणाट मंडळांनी केला. इतर ठिकाणीही- बिबवेवाडी (९७.६ डेसिबल), बालाजीनगर (९८.७), धनकवडी (९७), कर्वे रस्ता (९६.६), कर्वेनगर चौक (९९ डेसिबल), असा चढा आवाज राहिला.