वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांना बसते आणि मग वेतनवाढीसाठी मागण्या, आंदोलने करावी लागतात. याबाबतीत कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी नशीबवान ठरले आहेत, कारण कोणतेही आंदोलन न करता त्यांना शासनाने वेतनवाढ दिली आहे.. ती आहे दररोज १५ रुपयांची! इतकेच नव्हे तर त्यांच्या वेतनात दर तीन वर्षांनी वाढ व्हावी, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून कैद्यांच्या वेतनात वाढ झाली नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता सश्रम कारावास भोगणाऱ्या कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तीनही प्रकारांतील कैद्यांच्या पगारात प्रत्येकी पंधरा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे वेतन दररोज अनुक्रमे ५५ रुपये, ५० रुपये आणि ४० रुपये असेल. त्याचबरोबर खुल्या कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांना दररोज ७० रुपये वेतन दिले जाणार आहे.
राज्यात एकूण ४३ कारागृहे आहेत. या कारागृहातील कैद्यांना विणकाम, शिवणकाम, सुतारकाम, चर्मकला, कागदांपासून पिशव्या बनविणे, बेकरी, शेती अशी विविध कामे केली जातात. कामातील कौशल्यानुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी विभागणी करून कैद्यांचे वेतन ठरवले जाते. इतर राज्यातील कारागृहांमधील कैद्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील कैद्यांचे वेतन फारच कमी होते. वाढती महागाई लक्षात घेऊन त्यांचे वेतन निश्चित करण्यासाठी राज्य शासनाकडून कारागृह महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीवरून ही वेतनवाढ देण्यात आली आहे.
कारागृहात प्रत्येक कैद्याचे एक खाते असते. कैद्याने काम केल्याचे पैसे या खात्यात जमा केले जातात. कैदी या पैशातूनच कारागृहाच्या कॅन्टीनमधून बिडी, साबण, तेल, चिवडा, फरसाण अशा वस्तू खरेदी करतात. काही कैदी या वेतनातून मिळालेली रक्कम साठवून ठेवतात. काही कैद्यांच्या कुटुंबीयांना मनीऑर्डरद्वारे पैसे पाठविले जातात. याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की राज्य शासनाच्या आदेशानुसार वेतनवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
 
संजय दत्तला आता चाळीस रुपये
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व अभिनेता संजय दत्त हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला सश्रम कारावासाची शिक्षा झाल्यामुळे तो कारागृहात पेपर पासून पिशव्या बनविण्याचे काम करतो. मात्र, तो अकुशल कामगार असल्यामुळे त्याला पंचवीस रुपये मिळत होते. आता शासनाने वेतनवाढ केल्यामुळे त्याला आता दिवसाला चाळीस रुपये वेतन मिळणार आहे.