गेल्या पाच वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल सात हजार वाहनांची चोरी झाल्याचे पुणे पोलिसांकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये समाधानाची बाब म्हणजे या गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरीचे प्रमाण निम्म्यापर्यंत खाली आले असले तरी सध्या वर्षांला पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतून दिवसाला तीन वाहने चोरीला जात आहेत. चोरीला जाणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी वाहनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
पुणे शहरात तब्बल तीस लाख दुचाकींची संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहन चोरी ही पुणे पोलिसांसमोर एक डोकेदुखी ठरली आहे. या वाहनचोरांना आळा घालण्यासाठी शहर गुन्हे शाखेत वाहनचोर विरोधी पथकाची निर्मिती केली होती. पण, या पथकाची कामगिरी सुमार झाल्यामुळे हा विभाग बंद करण्यात आला. तरीही पुण्यात वाहनचोरी थांबलेली नाही. दिवसाला दोन ते तीन वाहन चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात वाहन चोरीमध्ये सर्वाधिक मोटारसायलक चोरीचे प्रमाण मोठे आहे.
पुणे पोलिसांकडील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यानंतर २०१० मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयातून तब्बल दोन हजार शंभर वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. तर, २०११मध्ये त्यात थोडीशी घट होऊन त्यावर्षी अठराशे वाहने चोरीला गेली. २०१२ मध्ये हे प्रमाण बाराशेवर आले. तर २०१३ मध्ये एक हजार आणि २०१४ मध्ये साडेनऊशे वाहनांची चोरी झाल्याची नोंद आहे. यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण हे ९० टक्क्य़ांजवळ आहे. वाहन चोरीचे प्रमाणात निम्म्यापर्यंत घट झाली असली तरी पुण्यातून सध्या वर्षांला हजार वाहने चोरीला जात असल्यामुळे वाहने लावताना वाहन चालकांच्या मनात धकधक निश्चित असते. त्यामुळे दुचाकीस्वार विशेष काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांकडे साडेसातशे बेवारस वाहने
शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांचे मालक नसलेली आठशे वाहने पडून आहेत. यामध्ये काही वाहने गुन्ह्य़ात जप्त केलेलीही आहेत. मात्र, सर्वाधिक वाहने ही बेवारस अवस्थेत सापडलेली आहेत. अनेक वेळा मोटारसायकल चोरी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर किंवा त्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्यानंतर ती कुठेतरी सोडून दिल्याचे प्रमाणसुध्दा मोठे आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांकडून दोन दिवस थांबवून मोटारसायकल शोध घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे पुणे पोलिसांकडे साडेसातशे बेवारस वाहने पडून असल्याचे दिसून आले आहे.