‘चांगले रस्ते हे देशाचा आणि शहरांचा विकास करत असतात. त्यादृष्टीनेच रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून रस्ते निर्मितीचा वेग हा प्रतिदिन ३० किलोमीटपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुंबई-नागपूर हा प्रवास आठ तासांवर आणण्याच्यादृष्टीने महामार्गाची निर्मिती करण्यात येत असून त्याला पुणे जोडण्याचाही प्रयत्न करण्यात येईल,’ असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी सांगितले.
सिम्बायोसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट अँड ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्फ्राबेझ’ या व्याख्यानमालेच्या उद्घटनप्रसंगी गडकरी बोलत होते. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, डॉ. प्रतिमा शेवरे, आर. सी. सिन्हा आदी उपस्थित होते.
या वेळी गडकरी म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’ हव्याच आहेत. मात्र, त्याचवेळी ग्रामीण भागाच्या विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. रस्ते हा विकासाचा पाया आहे. आतापर्यंत ३ लाख ८० हजार कोटी रुपयांचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. विकासाच्यादृष्टीने शहरांचे विकेंद्रीकरण होणेही गरजेचे आहे. ‘स्मार्ट सिटीज’ निर्माण करण्यासाठी भूमिअधिग्रहण गरजेचे आहे. मात्र, आता केंद्राने ती जबाबदारी राज्यांकडे सोपवली असून राज्यशासन भूमी अधिग्रहणाबाबत निर्णय घेईल. त्याचप्रमाणे यापुढे विकास हा फक्त सरकारच्या पैशावर होणे शक्य नाही. खासगी क्षेत्राची मदत घ्यावीच लागेल. स्मार्ट सिटीच्या निर्मितीत ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये रूग्णालये, शिक्षणसंस्था या सरकारी असूच नयेत.’