महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सोमवार (९ नोव्हेंबर) पासून शहरात रोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. संपूर्ण शहरात १४ नोव्हेंबपर्यंत रोज एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल. या काळात ज्या वेळेत पाणी येत आहे त्याच वेळेत शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात ७ सप्टेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र दिवाळीचा सण लक्षात घेऊन काही दिवस शहरात रोज एक वेळ पाणीपुरवठा करावा, असा निर्णय महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. पक्षनेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल. त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात असून तसे नियोजनही करण्यात येत असल्याचे अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा विभाग) व्ही. जी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सांगितले. शहरात सध्या एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून ज्या भागात ज्या वेळेत पाणीपुरवठा होत आहे त्याच वेळेत सहा दिवस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.