पर्यावरण अहवालातून चित्र स्पष्ट

पुणे : जागतिक महासाथ ठरलेल्या करोना विषाणू संसर्गामुळे शहरात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बधांचादैनंदिन जीवनावर परिणाम होऊन नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत असला तरी पर्यावरणावर मात्र त्याचा सकारात्मक बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाळेबंदीच्या कालावधीत शहरातील हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी झाल्याची नोंद महापालिके ने तयार के लेल्या पर्यावरण अहवालात करण्यात आली आहे. वर्षभरात नवीन वाहन नोंदणीचे प्रमाणही ३९ टक्क्यांनी घटले असून शहरात वर्षभरात १ लाख ५१ हजार १६ नवीन वाहनांची नोंद झाली आहे.

शहराचा सन २०२०-२०२१ या वर्षांचा पर्यावरण अहवाल महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी महापौर मुलरीधर मोहोळ यांना सादर करण्यात आला. या पर्यावरण अहवालात टाळेबंदीच्या कालावधीत प्रदूषणात घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक महासभेत १९३ देशांनी मान्य के लेली आणि १ जानेवारी २०१६ पासून अमलात आलेली १७ शाश्वत विकास ध्येय आणि १६९ उद्दिष्टे हे या अहवालाचे वैशिष्टय़ आहे.  पर्यावरण अहवाल मांडताना काही मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित के लेल्या डीपीएसआयआर (डी- ड्रायव्हिंग फोर्सेस, पी- प्रेशर, एस- स्टेटस, आय- इम्पॅक्ट, आर-रिस्पॉन्स) या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे.

नवीन वाहन नोंदणीत घट

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये १ लाख ५१ हजार १६ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. २०१९ च्या तुलनेत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३९ टक्क्यांची घट दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या दरम्यान शहरात १३ हजार ९५० सीएनजीवरील वाहनांची नोंद झाली आहे. तर सार्वजनिक वाहतुकीसाठी २ हजार ४३१ गाडय़ा असून त्यापैकी १ हजार ७५९ सीएनजी वाहने आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात अहवाल

  •   निर्बधांमुळे  वाहतूक आणि व्यावसायिक ठिकाणे बंद असल्याने प्रदूषाणात घट
  •  ऊर्जेची मागणी ५० टक्क्यांनी कमी, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये दुपटीने वाढ
  • गावांच्या समावेशामुळे शहराचे क्षेत्रफळ ५१८.४५ चौरस किलोमीटर
  •  गणेशखिंड उद्यान जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर