पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनेत फुकटय़ा प्रवाशांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तिकिटाविना प्रवास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना दंड करण्याबाबत पीएमपीचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी तिकीट तपासनिसांना लक्ष्य दिले असून त्यामुळे फुकटे प्रवासी सापडण्याचे प्रमाण गेल्या महिनाभरात दुप्पट झाले आहे.
पीएमपीची सेवा कार्यक्षम करण्यासाठी डॉ. परदेशी यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जास्तीतजास्त गाडय़ा मार्गावर आणल्या जात असल्यामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढले असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गाडीला मार्गाची व क्रमांकाची पाटी असली पाहिजे, असेही आदेश देण्यात आले आहेत. पीएमपीतील फुकटय़ा प्रवाशांचीही गंभीर दखल घेण्यात आली असून विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी शोधून काढण्यासाठी तिकीट तपासनिसांना आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहरातील पीएमपी मार्गावर तिकीट तपासणी करण्यासाठी ३२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत, तर पिंपरी महापालिका हद्दीतील मार्गावर तिकीट तपासणीसाठी १६ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात दोन वा तीन जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे काम प्रभावी होण्यासाठी आवश्यक सूचना डॉ. परदेशी यांनी तिकीट तपासणी पथकांना दिल्या आहेत.
या पथकांमार्फत आतापर्यंत पुणे व पिंपरीत मिळून रोज १४ ते १५ हजार रुपये दंड वसूल केला जात होता. मात्र, तपासणी पथकांना लक्ष्य ठरवून देण्यात आल्यानंतर लगेचच विनातिकीट प्रवासी शोधण्याचे काम प्रभावी रीत्या सुरू झाले आहे. त्यामुळे दंडापोटी मिळणारे उत्पन्न पूर्वीच्या दुप्पट झाले आहे. सध्या रोज २९ ते ३० हजार रुपये दंडातून मिळत आहेत. तिकीट न काढता प्रवास करणारा प्रवासी आढळल्यानंतर त्याला १०० रुपये दंड केला जातो. गर्दीच्या मार्गावर तसेच गर्दीच्या थांब्यांवर सध्या तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. डेपोंमधील काही अधिकाऱ्यांना तसेच थांब्यांवरील स्टार्टर्सनाही तपासणीचे काम करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. हे अधिकारी घरून कार्यालयात येतात, त्या वेळी तसेच अन्यत्र प्रवास करतात त्या वेळी गाडीतील सर्व प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी त्यांनी करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचे अधिकारीही तिकीट तपासणीचे काम करत आहेत.