दिवाळीनिमित्त नऊ ते १३ नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये पुणे शहराला रोज दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने शुक्रवारी घेतला. १४ नोव्हेंबरपासून पुन्हा दिवसाआड एकवेळा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये यंदा ५० टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. आज रोजी खडकवासला प्रकल्पामध्ये १५.३६ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील नियोजन करून दिवाळीच्या काळात पाच दिवस दररोज दोनवेळा पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील सर्व पक्षनेत्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दिवाळी संपल्यावर शनिवारपासून पुन्हा दिवसाआड एकवेळा पाणी पुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.