पिंपरी येथे आगीच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत डालडा (वनस्पती तूप) तयार करणाऱ्या काळभोर येथील गोदामाला आग लागली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने हा सगळा प्रकार घडला. डालडाचे ३०० बॉक्स वितळल्याने अर्धा किलोमीटर पर्यंत हे तूप वितळून पसरले होते. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी जात असताना त्यांचे पाय या तुपावरून घसरत होते. मात्र प्रयत्नांची शर्थ करून त्यांनी ही आग आटोक्यात आणली. तर दुसऱ्या एका घटनेत काळेवाडी ते पिंपळे गुरव या ७ किमी रस्त्यावर ऑईल सांडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याने हा रस्ता स्वच्छ केला.

डालडा गोदामाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. वितळलेले तूप स्वच्छ करताना जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. प्रताप चव्हाण, अशोक कानडे, प्रतीक कांबळे, मुकेश बर्वे, भूषण येवले, विघ्नेश वाटकरे, काशीनाथ ठाकरे, विशाल जाधव, चालक विशाल लाडके यांनीही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत केली. दुसऱ्या घटनेत रस्त्यात सात किलोमीटर परिसरात हायड्रॉलिक ऑईल सांडले होते. त्यामुळे अनेक दुचाकी घसरल्या. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाला यासंदर्भातली माहिती मिळताच हे ऑईल पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करण्यात आले. ज्यामुळे मोठा अपघात टळला.