23 July 2018

News Flash

‘संविधान सन्मान मूक मोर्चा’त निळाईचे दर्शन

घटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि त्यानंतर या मूक मोर्चाला प्रारंभ झाला.

निळे ध्वज हाती घेतलेले कार्यकर्ते.. निळ्या साडय़ा परिधान केलेल्या युवती आणि महिला.. युवकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्यावरील निळे फेटे आणि निळ्या रंगाच्या टोप्या.. अशा वातावरणात रविवारी निघालेल्या ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’द्वारे निळाईचे दर्शन घडले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण करण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देऊन युवती आणि महिलांनी नेतृत्व केलेल्या या मोर्चाची सांगता झाली.

संविधान दिनाचे औचित्य साधून पुण्यातील विविध संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समाजातील विविध सामाजिक गट-समूहांचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणून ते घटनेच्या चौकटीत सुटावेत या उद्देशातून जिल्हा पातळीवरील ‘संविधान सन्मान मूक मोर्चा’ आयोजित केला होता. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध समाजघटकांच्या युवतींनी पुष्पहार अर्पण केला.

घटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि त्यानंतर या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. युवती आणि महिला मोर्चाच्या अग्रभागी होत्या. तर, युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यानंतर मोर्चामध्ये शेवटच्या फळीत विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, कष्टकरी कामगार हे समाजघटक एकजुटीने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

हाती घेतलेले निळे ध्वज आणि निळे फेटे बांधून पुरुष, महिलांनी, युवक-युवती, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता. लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा संत कबीर चौक, रास्ता पेठ पॉवर हाऊस चौक, समर्थ पोलीस ठाणे, नेहरू मेमोरियल हॉल, आंबेडकर पुतळा, इस्कॉन मंदिर, हॉटेल ब्लू नाईल या मार्गाने विधान भवन येथे चारच्या सुमारास पोहोचला.  विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दहा युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे मोर्चाचे निवेदन दिले. भाग्यशा कुरणे, सना अन्सारी, तेजल राऊत, प्रतिमा पडघन, सदफ घोटेकर, पिंकी वाजे या युवतींनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. सामूहिक राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

संविधान सन्मान मूक मोर्चाच्या प्रमुख मागण्या

* अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.

* स्त्रियांवरील अत्याचाराच्या संदर्भात विशेष द्रुतगती न्यायालये सुरू करावीत.

* आश्रमशाळांमधील विद्याíथनींना संरक्षण व आदिवासींच्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी.

* आदिवासी आणि इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणात बोगस दाखला घेणाऱ्यांच्या घुसखोरीस प्रतिबंध करावा.

* लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील स्मारकाची उभारणी करावी.

* भटक्या विमुक्तांना संरक्षण तसेच अर्थसंकल्पात वाटा द्यावा.

* सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षण द्यावे.

* सर्वानाच ‘केजी टु पीजी’ संपूर्णपणे मोफत शिक्षण देताना सर्व प्रवर्गातील महिलांना ‘नॉन क्रिमीलीअर’ची अट शिथिल करावी.

* हाताने मला वाहण्याची अमानवीय प्रथा तत्काळ बंद करण्यात यावी.

* शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी आणि रास्त हमी भाव द्यावा.

समाजासाठी मोर्चात

‘संविधान सन्मान मूक मोर्चा’च्या अग्रभागी दुचाकीवर असलेले छत्रपती पुरस्कारविजेते अपंग खेळाडू दिलीप सोनवणे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर परिधान केलेला निळा फेटा, कपाळावर निळा टिळा, दुचाकीवर निळ्या अक्षरातील ‘जय भीम’, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट-पायजमा आणि दुचाकीवर मागे बसलेला लहान मुलगा असे दुचाकी चालवीत असलेल्या सोनवणे यांनी समाजाच्या हितासाठी मोर्चामध्ये सहभागी झालो असे सांगितले.

मागण्या सरकापर्यंत पोहोचविण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही –

संविधान सन्मान मूक मोर्चा विधानभवन परिसरात आल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. या मागण्या त्वरित शासनाकडे पाठवून देण्याचे आश्वासन राव यांनी दिले. तसेच आपल्या अनेक मागण्यांवर सरकारने या आधीच कार्यवाही सुरू केली असून सरकारला आपल्या मागण्यांबाबतची माहिती या आधीच मिळालेली आहे. तरीही माझ्याकडूनही आपले निवेदन सरकापर्यंत पोहोचवेन, अशी ग्वाही राव यांनी दिली.

First Published on November 28, 2016 5:39 am

Web Title: dalit muk morcha in support of atrocities act