‘‘रामदास आठवले ‘पँथर’ राहिले नसून ते ‘म्याव’ झाले आहेत. मिलिंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आठवले यांच्याकडे हिंदू कॉलनीतला बंगला कसा आला? पैसे कमावण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठीच आठवले भारतीय जनता पक्षाकडे गेले आहेत,’’ असा आरोप ‘दलित पँथर’ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी केला आहे. संघटनेने विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास पाठिंबा दिल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
सोनवणे म्हणाले, ‘‘या वेळी कोणतीही मागणी न करता राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे संघटनेने ठरवले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला आमचा फायदा होऊ शकेल. आंबेडकरी चळवळीतील लोक जातीयवादी व धर्माध शक्तींच्या बरोबर गेल्यामुळेच दलित समाज दुर्लक्षित राहिला आहे. ज्यांनी दलित समाजाला गावाबाहेर ठेवले, अशा कडव्या धर्मवाद्यांबरोबर जाण्याचा निर्णय रामदास आठवलेंनी घेतला. त्याचा आम्ही निषेध करतो. पैसे कमावण्यासाठी आणि मंत्री होण्यासाठीच आठवले भाजपबरोबर आहेत.’’
‘संघटनेचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनीही अखेरच्या क्षणी रुग्णालयात असताना ‘जातीयवादी वागणूक मिळत असल्यामुळे ‘शिवशक्ती-भीमशक्ती’बरोबर आता जायचे नाही,’ अशा भावना व्यक्त केल्या होत्या. राष्ट्रवादीबरोबर जायला हवे अशी चर्चाही झाली होती,’ असेही सोनवणे यांनी सांगितले.