पुण्यासाठी १३.३७ टीएमसी पाणी जमा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमधील पाणीसाठय़ात गेल्या काही दिवसांच्या पावसाने चांगली वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या धरणासाठय़ाच्या तुलनेत आता जमा झालेले पाणी दुपटीच्या जवळ पोहोचले आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये एकूण १३.३७ टीएमसी (अब्ज घन फूट) पाणीसाठा झाला आहे. पाणीकपात न करता हे पाणी पुण्याला साधारणत: साडेआठ ते पावणेनऊ महिने पुरु शकेल एवढे आहे.

गेल्या वर्षी १३ जुलैला पुण्याच्या धरणांमध्ये ७.२७ टीएमसी पाणी होते आणि धरणे २४.९४ टक्के भरली होती. यंदा धरणे आतापर्यंत ४५.८६ टक्के भरली आहेत. हा पाणीसाठा गतवर्षीच्या दुपटीपेक्षा १.१७ टीएमसीने कमी आहे.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण ९२.६१ टक्के भरल्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरुन रात्री ४२४५ क्यूसेकने (घन फूट प्रति सेकंद) पाणी सोडण्यात आले. मंगळवारी या धरणातून ९४०४ क्यूसेकने पाणी सोडले गेले होते. नदीपात्र प्रथमच दुथडी भरुन वाहू लागल्याने बुधवारी बाबा भिडे पूल आणि काकासाहेब गाडगीळ

पुलावर पाणी बघायला आलेल्यांचे घोळके दिसून येत होते. वेगाने वाहणाऱ्या पाण्याचे फोटो काढण्याची हौसही पुणेकरांनी पुरेपूर भागवून घेतली.