पुण्याच्या धरणांमध्ये २२.२८ टीएमसी पाणी

बुधवारी दिवसभर पडलेल्या जोरदार पावसाने पुण्याच्या धरणांमध्ये जवळपास तीन महिने पुरेल इतक्या पाण्याची भर घातली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांमध्ये बुधवारी सकाळी सहा वाजता १८ टीएमसी पाणीसाठा होता. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत धरणसाठा २२.२८ टीएमसी (अब्ज घन फूट) झाला होता. गेल्या वर्षी याच दिवशी पुण्याच्या धरणांमध्ये १३.९३ टीएमसी पाणी होते.

दिवसभर पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी खडकवासला धरण शंभर टक्के भरले. दुपारी तीन वाजल्यापासूनच खडकवासलातून २२,८०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली व नंतर विसर्ग वाढवून ३१,४०० क्यूसेकने पाणी सोडले गेले. साडेचार वाजताच्या सुमारासच पालिकेतर्फे नदीकाठच्या भागांना ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला. रात्री नऊ वाजता धरणातून पुन्हा ३९,६०० क्यूसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली.  मुठा नदीला आलेले प्रचंड पाणी पाहण्यासाठी शहरातील समांतर पुलांवर उत्साही नागरिकांनी पावसातही गर्दी केली होती. नदीकाठच्या रस्त्यांवर लावलेल्या काही चारचाकी गाडय़ा पुरात बुडाल्या. वस्त्या व सोसायटय़ांनाही पूरसदृश स्थितीचा फटका बसला. अनेक इमारतींमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. सिंहगड रस्त्यांवरील पूरबाधित नागरिकांची महापालिका शाळा, मंगल कार्यालये व भाजी मंडईच्या इमारतीत तात्पुरत्या राहण्याची सोय करण्यात आली.

dam-water-chart