पुणे जिल्ह्य़ातील बहुतांश धरणे पूर्णपणे भरली असून, त्यांच्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्याच्या खालच्या बाजूला असलेले मोठय़ा क्षमतेचे उजनी आणि वीर ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरले आहेत. २०१२ सालच्या दुष्काळानंतर उजनी धरण यंदा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पुण्याला पाणी पुरविणारी चार धरणेसुद्धा पूर्ण भरली आहेत. त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने त्यांच्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
या हंगामात पावसात अनेक चढउतार पाहायला मिळाले. सुरुवातीला त्याने सुमारे दीड महिने ओढ दिली. त्यानंतर तीन आठवडे जोरदार पाऊस पडला. या काळात पावसाने तूट भरून काढली. त्यानंतर आता धरणांच्या क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे बरीचशी धरणे पूर्णपणे भरली आहेत. पुणे जिल्ह्य़ातील जवळजवळ सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यात पानशेत, वरसगाव, मुळशी, पवना, भाटघर, डिंभे, नीरा देवघर, भीमा-उजनी, वीर अशा धरणांचा समावेश आहे. या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा या नद्यांची पातळी वाढली आहे. धरणांच्या क्षेत्रात  पडत असलेल्या पावसाचे प्रमाण खूप जास्त नसल्याने धरणांमधून पाणी सोडण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्य़ातील धरणे पूर्ण भरल्याची स्थिती या हंगामात आता पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्याचा जोर खूप मोठा नसेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्याच्या धरणांचा साठा १०० टक्के
पुण्याला पाणी पुरविणाऱ्या धरणांचा साठा शंभर टक्के झाला आहे. मात्र, धरणांच्या क्षेत्रात बाजूला पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण काही प्रमाणात रिकामे करून घेण्यात आले आहे. त्याचा साठा ८५ टक्क्य़ांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वरच्या धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी त्यात सामावून घेण्यात येऊ शकेल.धरणांच्या
आता तरी दिलासा?
पुण्यासाठीची सर्व धरणे पूर्णपणे भरली आहेत. तसेच, त्यांतून खालच्या बाजूला पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराला दोन वेळ पाणी पुरवठय़ाचा दिलासा मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. या वेळी पावसाचे आगमन लांबल्यामुळे पुण्यात पाणीकपात करण्यात आली होती. काही दिवसांसाठी एक दिवस आड पाणी देण्यात येत होते. त्यानंतर दररोज, पण एक वेळ पाणी देणे सुरू करण्यात आले. ते अजूनही सुरू आहे.