03 June 2020

News Flash

टेमघर धरण दोन वेळा  भरेल एवढा पाऊस

धरणात १ जूनपासून तब्बल पाच हजार चार मिलिमीटर पाऊस झाला असून ही आकडेवारी पाहता एवढय़ा पावसात टेमघर धरण दोन वेळा भरले असते.

आजवर पाच हजार मि.मी. पावसाची नोंद

टेमघर धरण परिसरात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १ जूनपासून तब्बल पाच हजार चार मिलिमीटर पाऊस झाला असून ही आकडेवारी पाहता एवढय़ा पावसात टेमघर धरण दोन वेळा भरले असते. दरम्यान,अद्यापही टेमघर धरण परिसरात तुरळक पाऊस पडत आहे.

टेमघर धरण मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे बांधले आहे. या धरणाचे बांधकाम २००० साली सुरू करून २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. हे धरण पुणे शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी आणि मुळशी तालुक्यातील एक हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित आहे.

टेमघर धरणाच्या परिसरात दरवर्षी साधारण दोन हजार ते दोन हजार चारशे मि.मी. एवढा पाऊस होत असतो. मात्र, यंदा तब्बल पाच हजार चार मि.मी. पाऊस आतापर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला आहे. म्हणजेच आतापर्यंत पावसाचे तब्बल साडेसात टीएमसी एवढे पाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या रूपाने पडले आहे. एवढय़ा पाण्यात हे धरण दोन वेळा भरले असते. तर, हे धरण भरल्यानंतर आतापर्यंत सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, टेमघर धरणाची गेल्या दोन वर्षांपासून दुरूस्ती सुरू असल्याने हे धरण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच रिकामे करण्यात आले होते. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात हे धरण १०० टक्के भरले. पहिल्यांदा १०० टक्के धरण भरले, तेव्हा या धरणाच्या परिसरात तब्बल तीन हजार मि.मी. पाऊसाची नोंद करण्यात आली होती. पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या धरणातून पुन्हा खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा हे धरण १०० टक्के भरले. सध्या या धरणात ३.३५ टीएमसी म्हणजेच ९०.२२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.

डिसेंबर महिन्यात धरण रिकामे करणार

टेमघर धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरण्यात आले आहे. पुणेकरांना लागणारे पाणी पावसाळ्यानंतर वरसगाव आणि पानशेत धरणांमधून न घेता सुरूवातीला टेमघर धरणातून खडकवासला धरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. हे धरण डिसेंबरमध्ये रिकामे झाल्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत धरणाच्या दुरूस्तीचे उर्वरित काम करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:29 am

Web Title: dam heavy rain akp 94 2
Next Stories
1 वडगावशेरी मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंद
2 दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची धुरा चारूकडे
3 राजकारणाला वाईट म्हणण्यापेक्षा वाईट राजकारण्यांना बाजूला सारा
Just Now!
X