पुणे : रत्नागिरी जिल्ह्य़ातील तिवरे धरण दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील धरणांची देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागतिक बँकेकडून राज्यातील धरणांसाठी ९४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी धरणे सुरक्षा समीक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांचे परीक्षण करण्यात येणार आहे.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार प्रमुख धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी टेमघर धरणाची दुरूस्ती गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. तर, उर्वरित तिन्ही धरणांचे परीक्षण करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या सूचनेनुसार अनुभवी निवृत्त तांत्रिक तज्ज्ञ आणि राज्याबाहेरील काही तज्ज्ञांचा धरणे सुरक्षा समीक्षा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या समितीकडून राज्यातील १६४ धोकादायक धरणांचा अहवाल घेण्यात येणार आहे. त्याचे तीन भाग करण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम आवश्यक असलेली धरणे, टप्प्याटप्प्याने दुरुस्तीची गरज असलेली धरणे आणि किरकोळ दुरुस्तीची गरज असलेली धरणे असे तीन भाग करण्यात आले आहेत. राज्यातील कोणत्याही धरणांना तातडीचा धोका  नसल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यात दुरुस्तीचे काम करण्याची गरज असलेल्या धरणांचे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांचा समावेश आहे. या समितीकडून या तिन्ही धरणांची पाहणी करून कोणत्या प्रकारची दुरुस्ती करण्याची गरज आहे, याबाबत सूचित करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे विभागातील धरणांचे परीक्षण करण्यासाठी डी. एन. मोडक यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोडक यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, भूवैज्ञानिक, जलवैज्ञानिक, भूकंप तज्ज्ञ आणि समितीचे सदस्य सचिव अशी आठ जणांची समिती धरणांचे परीक्षण करणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

वरसगाव धरणाची गळती कमी करण्याचे काम

पुण्यातून वाहणाऱ्या मुठा आणि तिच्या उपनद्यांवर टेमघरसह वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे आहेत. वरसगाव धरणाची क्षमता १२.८३ अब्ज घनफूट (टीएमसी), पानशेत धरणाची क्षमता १०.६५ टीएमसी आणि खडकवासला धरणाची १.९७ टीएमसी एवढी आहे. खडकवासला धरणाचे बांधकाम दगडाचे असून त्याला मातीचा आधार आहे. वरसगाव धरण १९९३ साली बांधून पूर्ण झाले. २०१४ मध्ये या धरणाला मोठय़ा प्रमाणात गळती लागल्याचे समोर आले होते. त्यानंतर धरणाची गळती कमी करण्यात आली आहे.