पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस पडल्यामुळे त्यांच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. त्यांच्यातील पाणीसाठा आता २५ टक्क्य़ांच्या पुढे गेला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी असलेल्या पवना धरणाच्या साठय़ातही समाधानकारक वाढ (सुमारे ४० टक्के) झाली आहे. येत्या आठवडय़ाभरात पावसाचा विशेष जोर नसेल, त्यामुळे या काळात धरणांच्या साठय़ात संथगतीने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या परिसरात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडय़ात चांगला पाऊस पडला. त्याचा परिणाम म्हणून पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली. पुण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांचा एकूण पाणीसाठा आता २५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. त्यातील एकूण साठा ७.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही स्थिती खूपच समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या अखेरीस या धरणांमध्ये सहा टक्क्य़ांपेक्षाही कमी पाणीसाठा होता. पावसाने ओढ दिल्यामुळे पुणे शहरालाही पाणीकपात सोसावी लागली होती. त्या तुलनेत आता स्थिती चांगली आहे. पवना धरणातील साठा ३९.७६ टक्क्य़ांवर गेल्याने त्या धरणाचीही चांगली स्थिती आहे.
या सर्वच धरणांच्या क्षेत्रात गेल्या आठ-दहा दिवसांच्या काळात समाधानकारक पाऊस पडला आहे. टेमघर धरणाच्या क्षेत्रात सर्वाधिक ७६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पानशेत (६०३ मिलिमीटर) वरसगाव (५९७), पवना (४८७) आणि खडकवासला (२९१) या धरणांच्या क्षेत्रातही चांगला पाऊस पडला.
‘या आठवडय़ात फारसा पाऊस नसेल’
‘‘पावसाच्या दृष्टीने सध्याचा आठवडा फारसा समाधानकारक नसेल. हवामानाची आताची स्थिती पाहता पावसाच्या प्रमाणात ६ जुलैनंतरच वाढ होईल. तोवर तुरळक सरींवरच समाधान मानावे लागेल. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढू शकते.’’
– सुनीता देवी, पुणे वेधशाळेच्या संचालक
धरणांचा पाणीसाठा :
(धरणाचे नाव, साठा- टीएमसीमध्ये, टक्केवारी, जून महिन्यातील पाऊस- मिमीमध्ये या क्रमाने)
खडकवासला        १.१३        ५६.८२        २९१
पानशेत            ३.९७        ३७.११        ५९७
वरसगाव            २.०५        १५.८५        ६०३
टेमघर            ०.२१        ६.२५            ७६२