या वेळी पडलेल्या पावसाने पुण्यातील धरणांचा पाण्याचा कोटा भरला असून, आतापर्यंत तब्बल सात टीएमसी पाणी धरणांतून सोडण्यात आले आहे. अजूनही पावसाची शक्यता असून, आणखी एक ते दीड टीएमसी पाणी धरणांमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
पुण्याला पाणी पुरविणाऱ्या खडकवासला सिस्टिममध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर अशा एकूण चार धरणांचा समावेश होतो. या धरणांमध्ये एकूण २९.१५ टीएमसी इतके पाणी साठविण्याची क्षमता आहे. मात्र, सर्वसाधारणपणे या धरणांच्या क्षेत्रात दर पावसाळ्यात इतका पाऊस पडतो, की त्यावाटे सुमारे ३६ टीएमसी इतके पाणी मिळते. याचाच अर्थ धरणे भरल्यानंतरही सुमारे सात टीएमसी इतके पाणी सोडून दिले जाते. या वर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाने हा कोटा पूर्ण केला आहे. कारण खडकवासला सिस्टिममधील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. शिवाय या धरणांमधून सुमारे ६.७० टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
याबाबत या विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी सांगितले, की आतापर्यंत पडलेला पाऊस आणि सोडून दिलेल्या पाण्याची आकडेवारी पाहता, या वर्षी या धरणांच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या धरणांमध्ये १ जून ते १५ ऑक्टोबर या काळात इतका पाऊस पडतो, की त्यावाटे सुमारे दीड टीएमसी इतके पाणी मिळते. या वर्षीही अजून पावसाचा काळ बाकी आहे. आपल्या क्षेत्रातून मान्सून माघारी परतलेला नाही. त्यामुळे धरणे भरून ठेवल्यानंतरही आणखी काही पाणी नदीवाटे सोडून द्यावे लागेल. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडला होता. त्यामुळे नदीवाटे तब्बल १० टीएमसी इतके पाणी सोडून द्यावे लागले होते.

खडकवासला सिस्टिममधील सर्व चारही धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणांच्या क्षेत्रात १ जूनपासून आतापर्यंत (१८ सप्टेंबर) या काळात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे –
टेमघर                 ३०७७
वरसगाव             १९५५
पानशेत               १९६५
खडकवासला        ०७८१