पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून, धरणांच्या साठय़ातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये मिळून एकूण ८.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा असून, तो या धरणांच्या एकूण क्षमतेच्या २८ टक्के इतका आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणात सुमारे ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस सुरू आहेत. विशेषत: मंगळवारी त्याच्या प्रमाणात वाढ झाली. मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत या धरणांच्या क्षेत्रात दमदार पाऊस पडला. त्याचा परिणाम वाढलेल्या धरणसाठय़ाच्या रूपाने पाहायला मिळाला. आतापर्यंत २४ टक्क्य़ांच्या खाली असलेला पाणीसाठा आता २८ टक्क्य़ांच्या पलीकडे गेला आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: या आठवडय़ाच्या अखेरीस पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत धरणांच्या साठय़ात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणाच्या क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. तेथे मंगळवारी ५४ मिलिमीटरची नोंद झाली. त्यात मंगळवारी सकाळी ४०.८० टक्के पाणीसाठा होता.
पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे (पावसाच्या नोंदी मिलिमीटरमध्ये, धरणसाठा टीएमसीमध्ये):
नाव,        आजचा पाऊस,        १ जूनपासूनचा पाऊस,        पाणीसाठा,         टक्केवारी
खडकवासला    २५                ३३०                    ०.३८            १९.३३
पानशेत        ६२                ७९०                    ४.५२            ४२.४६
वरसगाव        ५८                ७९२                    २.९८            २३.२१
टेमघर        ७२                १०५८                ०.३६            ९.८४
एकूण        —                —                    ८.२४            २८.२८